मुंबई – शेअर बाजाराचे निर्देशांक ( stock market news today ) कमालीच्या उच्च पातळीवर असूनही देशांतर्गत गुंतवणूकदारांबरोबरच परदेशी गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी झाल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक नव्या विक्रमी पातळीवर गेले. महिंद्रा कंपनीने आपल्या वाहनाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे आज या कंपनीचा शेअर 2 टक्यांनी वधारला.
मात्र एकीकडे खरेदी होत असतानाच गुंतवणूकदार करेक्शनच्या शक्यतेमुळे तितकेच सावध आहेत. बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ( bombay stock market news ) सेन्सेक्स 403 अंकांनी म्हणजे 0.87 टक्क्यांनी वाढून 46,666 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ( national stock exchange ) निर्देशांक निफ्टी ( nse nifty ) 114 अंकानी उसळून 13,682 अंकावर बंद झाला.
आज झालेल्या खरेदीचा फायदा एचडीएफसी, एअरटेल, टायटन, एशियन पेंट, महिंद्रा या कंपन्यांना झाला तर आयसीआयसीआय बॅंक, इंडसइंड बॅंक, टेक महिंद्रा, स्टेट बॅंकेला नफेखोरीचा फटका बसला.
निर्देशांक का वाढत आहेत याबाबत विश्लेषकांनी सांगितले की, करोनावरील लसीमुळे जागतिक परिस्थिती सुधारली आहे. त्याचबरोबर भारताची स्थुल अर्थव्यवस्था मजबूत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्यामुळे पतमानांकन संस्था भारताचा विकास दर वाढणार असल्याचे भाकित करीत आहेत. या कारणामुळे भारतीय कंपन्याची उत्पादकता वाढण्याबाबत गुंतवणूकदार आशावादी झाले आहेत.
बर्गर किंगची घोडदौड….
बर्गर किंग कंपनीच्या आपीओतील ( IPO ) 60 रुपये किमतीचा शेअर 14 डिसेंबर रोजी शेअर बाजारावर नोंदला गेला. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजारात या कंपनीच्या शेअरची किंमत 199 रुपयावर गेली. आज शेअरच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे हा आयपीओ खरेदी करणारे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. मिसेस बेक्टर्स स्पेशॅलीटी फूडस् या कंपनीचा आपीओ कालपासून खुला झाला असून या आपीओलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज या आयपीओच्या शेअर्सची मागणी उपलब्ध शेअरच्या चार पटीने नोंदली गेली.