- स्मार्ट सिटीवरून प्रशासनावर ताशेरे
- मागील आठवड्यातील गोंधळाचे पडसाद
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी हेल्मेट घालून सभागृहात प्रवेश केला. मागील आठवड्यात बैठकीत सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे विरोधी पक्षातील सदस्यांनी हेल्मेट घालून प्रवेश करत सर्वांचेच लक्ष वेधले.
स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मागील आठवड्यात चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक असलेल्या सदस्यांनी चांगलाच राडा घातला होता. सभागृहातील माईक, प्लेट, फोन याची तोडफोड करत सभापती व त्यांच्यामध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हेल्मेट परिधान करून सभागृहात प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजपच्या या कारभाराचा निषेध दर्शविला.
यावेळी स्थायी समितीच्या बैठकीला शिवसेना सदस्य राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे सदस्य पंकज भालेकर, सुलक्षणा शिलवंत धर, पौर्णिमा सोनवणे यांनी हेल्मेट परिधान करून प्रवेश केला.
स्थायी समितीच्या बैठकीमध्ये अतिक्रमणांवरून सुरू झालेल्या चर्चेदरम्यान स्थायीतील भाजपचे सदस्य शशिकांत कांबळे यांनी पालिकेच्या कारभारावरून आयुक्तांवर ताशेरे ओढले. त्यांनी अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांवरून प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यांनी शहरात न्यायालयाच्या आदेश असल्याचे सांगून बांधकामे वाढू दिली जात आहेत. पालिका कारवाई करत नाही. ही बाब गांभीर्याने घेतली जात नसल्याची टीका अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे यांनी देखील केली.