मुंबई – गेल्या आठवड्यात भारतातील किरकोळ किमतीवर आधारित महागाई कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली होती. आज घाऊक किमतीवर आधारित महागाई कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. अमेरिकेतही महागाई कमी झाल्याची आकडेवारी गेल्या आठवड्यात जाहीर झाली होती.
त्यामुळे देश -विदेशातील गुंतवणूकदार सुखावले असून मंगळवारी शेअर बाजारात बरीच खरेदी झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 379 अंकांनी वाढून 59,842 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 127 अंकांनी म्हणजे 0.72 टक्क्यांनी वाढून 17,825 अंकावर बंद झाला.
तेल आणि नैसर्गिक वायू, बॅंकिंग आणि वाहन क्षेत्राच्या शेअरची जोरदार खरेदी झाल्यामुळे निर्देशांक वधारल्याचे दिसून आले. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांबरोबरच महिंद्रा, मारुती, एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र स्टेट बॅंक ऑफ इंडिया, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, टाटा कन्सल्टन्सी, एनटीपीस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
परदेशातील गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत आहेत. शुक्रवारी या गुंतवणूकदारानी तब्बल 3,040 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली असल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जाहीर केली. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमती 95 डॉलर पेक्षा कमी झाल्या आहेत. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात खरेदी होत असल्याचे विश्लेषकानी सांगितले.
जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर सांगितले की, घाऊक किमतीवर आधारित महागाइची आकडेवारी पाच महिन्याच्या निचांकावर गेली आहे. गेल्या आठवड्यामध्ये किरकोळ किमतीवर आधारित महागाईची आकडेवारी कमी झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे गुंतवणूकदार आता आगामी काळामध्ये महागाई वाढणार नाही असे गृहीत धरू लागले आहेत. अमेरिका, युरोप इत्यादी देशातून शेअर बाजार निर्देशांक वाढल्याचे दिसून आले. त्यानंतर भारतीय शेअर बाजारातही खरेदी झाल्याचे सांगण्यात आले.
……..