नाशिक उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी पुणे विद्यापीठाचे पाऊल

पुणे  – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या कामकाजासाठी सुरूवातीला 10 हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्याचा तसेच, स्थानिक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रोजगारनिर्मिती अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय एमबीए अभ्यासक्रम महापालिका शाळेत स्थलांतरित करण्याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये, बोर्ड ऑफ सबसेंटर (उपपरिसर मंडळ) या संवैधानिक मंडळाची तरतूद आहे. प्र-कुलगुरू हे त्याचे अध्यक्ष आहेत, तर कुलसचिव हे सदस्य सचिव आहेत. या मंडळाची पहिली बैठक नुकतीच नाशिक येथे झाली. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आणि इतर सदस्य उपस्थित होते. त्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या मंडळाने नाशिकच्या उपकेंद्रासाठी मिळालेल्या सरकारकडून मिळालेल्या सोनई (ता. दिंडोरी) येथील जागेलाही भेट दिली, अशी माहिती डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

सोनई हा भाग आदिवासी पट्ट्यात आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना त्याच भागात रोजगार उपलब्ध व्हावेत व त्यांच्यावर स्थलांतराची वेळ येऊ नये, यासाठी छोटे छोटे अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात मधमाशा पालन, येवला पैठणी व वाईन तंत्रज्ञानासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचा समावेश आहे.
दरम्यान, नाशिक उपकेंद्रावर गेल्या वर्षी एमबीए अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी आताची जागा कमी पडते, म्हणून नाशिक महापालिकेची एक शाळा भाडेतत्वावर मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती मिळाली की हा अभ्यासक्रम नव्या जागेत स्थलांतरित करण्यात येईल. याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.