“स्टार रेटिंग’ उपक्रमच अंधारात!

औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचे प्रमाण किती? : प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच माहिती नाही

पुणे – औद्योगिक क्षेत्रातील धुलिकण उत्सर्जन संदर्भात माहिती देण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे “स्टार रेटिंग’ उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, पुण्यातील बहुतांश कंपन्या या उपक्रमापासून दूर आहेत. त्यामुळे या प्रदूषणाबाबत अचूक माहिती मिळत नाही. ती मिळवायची कशी? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या “स्टार रेटिंग’ उपक्रमांतर्गत औद्योगिक कंपन्यांना त्यांच्या धूलिकण उत्सर्जनाच्या (पीएम10, पीएम 2.5) आधारे रेटिंग दिले जाते. यामध्ये सर्वाधिक प्रदूषणकारी कंपनीला एक, तर सर्वांत कमी प्रदूषण करणाऱ्या कंपनीला 5 स्टार असे रेटिंग दिले जाते. सध्या या उपक्रमांतर्गत पुण्यातील 24 बड्या कंपन्या सहभागी आहेत. मात्र, पुण्यातील कंपन्यांची संख्या पाहता हे प्रमाण अत्यल्प असून, इतर कंपन्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाची माहितीच मंडळाकडे उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, पुणे विभागांतर्गत रासायनिक, साखरनिर्मिती, रंगनिर्मिती, वाहनिर्मिती, ऊर्जा, वस्रोद्योग आणि अन्नप्रक्रिया अशा सर्वाधिक प्रदूषणकारी प्रकारातील कंपन्यांचा समावेश आहे.

याबाबत स्टार रेटिंग उपक्रमाचे प्रकल्प इशान चौधरी म्हणाले, “स्टार रेटिंग उपक्रमांतर्गत आम्ही औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचे निरीक्षण घेऊन त्यानुसार कंपन्यांना रेटिंग देतो. सध्या हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू आहे. तसेच त्याचा मुख्य केंद्र हे मोठे उद्योग आहेत. आगामी काळात या उपक्रमाची व्याप्ती वाढवून सुमारे 100-150 अतिरिक्त कंपन्या जोडण्याचा आमचा मानस आहे.’

राज्यातील 103 नवीन कंपन्या
स्टार रेटिंग उपक्रमांमतर्गत राज्यातील 103 नवीन कंपन्या समाविष्ट झाल्या असून, बुधवारी (दि.21) या कंपन्यांना मंडळातर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. यामध्ये पुण्यातील एका कंपनीचा समावेश आहे. नवीन उद्योगांपैकी 36 उद्योग-1 तारांकित, 29 उद्योग -2, 13 उद्योग- 3, 15 उद्योग-4 आणि 10 उद्योग – 5 तारांकित आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक 48 उद्योगांचा समावेश असून, पुण्यातील एक कंपनी यामध्ये समाविष्ट आहे. जोडल्या गेलेल्या नवीन उद्योगांपैकी 39 वस्त्र उद्योग आणि 25 रासायनिक उद्योगांचा समावेश आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.