सेंट व्हिन्सेंट संघाला फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद

पुणे – सेंट व्हिन्सेंट प्रशालेतर्फे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकरिता आयोजित केलेल्या फादर स्कोच स्मृती क्रीडा स्पर्धेत सेंट व्हिन्सेंट (2014) संघाने फुटबॉलचे विजेतेपद मिळवले. सेंट व्हिन्सेंट (2006) संघाने बास्केटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत फुटबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन आणि जलतरण या क्रीडाप्रकारांचा समावेश होता. या स्पर्धेत एकूण 500 हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

फुटबॉल स्पर्धेत एकूण माजी विद्यार्थ्यांच्या 36 संघांनी भाग घेतला होता. बास्केटबॉल स्पर्धेत माजी विद्यार्थ्यांच्या 12 संघांनी सहभाग नोंदविला होता. बॅडमिंटन स्पर्धेत 14 स्पर्धकांनी तर जलतरण स्पर्धेत 8 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत 1988 ते 2018 मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण तन्वीर इनामदार, सेंट व्हिन्सेंटचे प्राचार्य फादर फ्रान्सिस पाटेकर, लॉयला हायस्कूलचे प्राचार्य फादर अनिश, व्हिन्सेंट ओल्ड बॉईज संघटनेचे अध्यक्ष विक्रम केरींग, फादर केनेथ मिक्‍युटा, फादर ऍन्ड्रु फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले.

कुमार गटाच्या फुटबॉल स्पर्धेत प्रणव भंडारी याने केलेल्या एकमेव गोलाचा जोरावर सेंट व्हिन्सेंट (2014) संघाने सेंट व्हिन्सेंट (2006) संघाचा 1-0 असा पराभव करून विजेतेपद मिळवले. या गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान नायजेल डिक्रुझ, सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा मान प्रणल शेट्टी आणि सर्वाधिक गोलस्कोरर क्रिस्तोफर मोन्सेरेट्टे याला देण्यात आला. वरिष्ठ गटाच्या फुटबॉल स्पर्धेत फुटबॉल सेंट व्हिन्सेंट (1993 ) संघाने सेंट व्हिन्सेंट (1995) संघाचा टायब्रेकमध्ये 3-2 असा पराभव करून जेतेपद पटकाविले.

Leave A Reply

Your email address will not be published.