मुंबई – एसटी कामगारांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या असून काही मागण्यांवर चर्चा सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. एसटीची बांधिलकी प्रवाशांशी आहे, त्यामुळे एसटी सुरु झाली पाहिजे यावर एकमत झाल्याची माहिती खासदार शरद पवारांनी दिली.
एसटी महामंडळातील कामगारांच्या वेगवेगळ्या 21 संघटनांच्या कृती समितीसोबत आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा झाली.
शरद पवार म्हणाले, परिवहन मंत्री आणि बाकीच्या अधिकाऱ्यांनी कृती समितीसोबत चर्चा केली. माझ्या दृष्टीने महाराष्ट्राचा प्रवासी आहे तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. दोन महिने संपामुळे प्रवाशांची जी स्थिती झाली तिचं वर्णन न केलेलं बरं. दुसरं एक संकट देशावर आले, ते करोनाचा नवा अवतार आपण पाहत आहोत.
या सगळ्या गोष्टीचा परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होत आहे. असा परिणाम होत असतानाही राज्य सरकारला त्याची किंमत देण्याची, आर्थिक किंमत देण्याची स्थिती असताना सुद्धा माझ्या मते परिवहन मंत्र्यांनी जेवढं जास्त करता तेवढं करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा प्रयत्न याठिकाणी कृती समितीच्या लोकांसमोर मांडल्यानंतर कृती समितीचेही काही प्रश्न आहेत, सरकारच्या निर्णयामध्ये काही कमतरता आहेत, हे कृती समितीने निवेदन आणून दिले. त्याही बाबत सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी मंत्रीमहोदयांनी दिली, असे त्यांनी सांगितले.
शरद पवार म्हणाले, “आनंद गोष्टीचा एका गोष्टीचा आहे, कृती समितीचे 20-22 प्रतिनिधी आहेत त्या सर्वांना कामगारांच्या प्रश्नांचा जसा आग्रह आहे जो रास्त आहे, त्याप्रमाणे प्रवाशांचं हित आणि एसटी टिकली पाहिजे, याही बाबतीत ते सकारात्मक आहेत. त्यामुळे त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. माझं आवाहन आहे कर्मचाऱ्यांना आपली बांधीलकी प्रवाशांसी आहे, जे आवाहन कृती समितीने कर्मचाऱ्यांना केलं आहे त्याचा गांभीर्याने विचार कर्मचाऱ्यांनी करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.