पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारले जाते. तसेच रुग्णालय व रुग्णवाहिकांसाठी अवाजवी बिल घेतले जाते आहे. ही बिले तपासणीसाठी महापालिकेने 4 सदस्यांचे भरारी पथक नियुक्त केले आहे. त्याद्वारे खासगी रुग्णालयाची तपासणी केली जाणार आहे.
हे पथक खासगी रुग्णालयात अचानक जाऊन बिलांची तपासणी करणार आहे. पालिकेचे मुख्य लेखापरिक्षक अमोद कुंभोजकर यांच्या नियंत्रणाखाली ही पथके तैनात करण्यात आली आहेत.
एका पथकात वैद्यकिय अधिकारी डॉ. करूणा साबळे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, उपलेखापाल शिवाजी गराडे, लिपिक अक्षय देशपांडे तर दुसऱ्या पथकात वैद्यकिय अधिकारी डॉ. कल्पना गडलिंकर, सहायक समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे, उपलेखापाल सुभाष देवकाते, मुख्य लिपिक प्रमोद सावरकर यांचा समावेश आहे.