पुणे – इन्फोसिस यांच्या वतीने आयोजित सातव्या इन्फोसिस करंडक आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत शहरातील सॉफ्टवेअर उद्योग क्षेत्रातील १६ नामांकित संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा १३ जानेवारी पासून इन्फोसिस मैदान, हिंजवडी, फेज २ या ठिकाणी दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना इन्फोसिस रिक्रिएशनल क्लब, पुणेच्या कोअर समितीचे सदस्य सुनिल टक्के यांनी सांगितले की, इन्फोसिस यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. स्पर्धेत आयटी क्षेत्रातील इन्फोसिस(गतविजेता), यार्डी(गतउपविजेता),केपीआयटी, व्हेरिटास, कॉग्निझंट, मर्क्स, टीसीएस, इन्फोसिस बीयु, दसॉल्ट सिस्टीम, डॉइश बँक, एफआयएस ग्लोबल, एन्कोरा, सीजीआय, सिमेन्स, टेक महिंद्रा आणि मास्टरकार्ड हे संघ आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
स्पर्धेचे सामने साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. प्रत्येक गटात चार संघ अशी चार गटात विभागणी करण्यात आली असून यातील अव्वल दोन उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार १० मार्च रोजी होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक व ५०,०० रुपये, तर उपविजेत्या संघाला करंडक व ३०,००० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
याशिवाय मालिकावीराला ५,००० रुपये, सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उदघाटन इन्फोसिस रिक्रिएशनल क्लब, पुणेचे मुख्य अनंत बारटक्के यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.