शिक्षकांना पगार नाही अन्‌ विद्यार्थ्यांना शुल्क नाही

जोग महाराज यांच्या 101 पुण्यतिथीनिमित्त विशेष : जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा स्वावलंबनाचा वारकरी मंत्र

-ज्ञानेश्‍वर फड

आळंदी – देशांत ब्रिटिशांची राजवट असताना त्यागी वृत्तीच्या सद्‌गुरू जोग महाराज यांनी श्री क्षेत्र आळंदी येथे 1917 मध्ये विद्यार्थ्यांना शुल्क अन्‌ शिक्षकांना पगार नाही या तत्त्वावर वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याच तत्त्वावर आजपर्यंत ही संस्था कार्यरत आहे. यापुढेही हे कार्य असेच सुरू राहील. या संस्थेतून वारकरी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेले हजारो विद्यार्थी समाजाला भक्तीमार्गाची दिशा दाखवत आहेत.

श्री क्षेत्र आळंदी येथे सदगुरू जोग महाराज यांचा 101 वा पुण्यातिथी महोत्सव आज साजरा करण्यात आला. करोनामुळे दरवर्षी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणारा हा सोहळ्यास मोजक्‍याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यानिमित्त दैनिक प्रभातने वारकरी शिक्षण संस्थेचे कार्यवाहक तुकाराम म मुळीक यांच्याशी संवाद साधला.

सद्‌गुरू जोग महाराज हे युगपुरूष होते. साक्षात संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी त्यांना अनुग्रहित केले होते. या संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी हे संत ज्ञानेश्‍वर महाराज, जगद्‌गुरु तुकाराम महाराज, सद्‌गुरू जोग महाराज यांचे अनुयायी आहेत. जोग महाराजांनी लावलेल्या रोपाचा आज वटवृक्ष झाला आहे, असे मुळीक म्हणाले.

बंकटस्वामी महाराज, मारूती महाराज गुरव, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, एसपी कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य मामासाहेब दांडेकर यांसारख्या भाविक रत्नांची पाखरण त्यांनी वारकरी पंथामध्ये केली. राज्यातील बहुतांश गड, संस्थानांचे महंत हे या वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहेत. तसेच महाराष्ट्रासह देशभरात जेवढे हरिनाम सप्ताह होतात. त्यातील कीर्तन, प्रवचन देणारे महाराजही याच संस्थेचे विद्यार्थी आहेत. त्यासाठी चार वर्षाचा अभ्यासक्रम असून त्यात मराठी व्याकरण, श्रीमद भगवत्‌ गीता, ज्ञानेश्‍वरी, विचारसागर, पंचदशी, अभंग गाथा यांसह संत साहित्याचा समावेश असतो.

भजन कीर्तन उदरनिर्वाहासाठी नको…

जोग महाराजांनी संस्थेची उभारणी केली तेंव्हापासूनच विद्यार्थ्यांना उदरनिर्वाहासाठी व्यावसायिक शिक्षणही देण्याचा पायंडा पाडला. विणकाम, शिवणकाम, सुतारकाम आदी व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जात असे. येथून शिकून गेल्यानंतर कीर्तन, प्रवचन हे उदरनिर्वाहाचे साधन नसावे. विद्यार्थ्यांनी उदरनिर्वाहासाठी कोणताही व्यवसाय करावा व रात्री किर्तन भजन करून वारकरी संप्रदायाच्या प्रसाराचे कार्य करावे असा जोग महाराज यांचा उद्देश होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.