प्रा. विजया पंडित
म्हातारपण कुणालाच नको असते. प्रत्येकाला वाटत असते, की आपण सदैव तरुण राहावे. खरोखरच असे झाले तर…
वार्धक्य हा जीवनाचा अविभाज्य भाग असून, प्रत्येक तरुणाला अखेर वार्धक्य येतेच. परंतु इस्राएलच्या शास्त्रज्ञांनी एक क्रांतिकारी संशोधन केले असून, त्यामुळे माणूस कायम तरुण राहू शकेल आणि 75 व्या वर्षीही तो 25 वर्षांचा वाटू शकेल इतके त्याचे शरीर धडधाकट असेल. ज्या ज्येष्ठांवर हा प्रयोग करण्यात आला, त्यांचे शरीर आता पंचविशीतील तरुणासारखे बनले आहे. जर हे संशोधन यशस्वी झाले तर जगासाठी ते एक मोठे वरदान असेल. कारण जगातील प्रत्येक व्यक्ती सदा तरुण राहू इच्छिते. या प्रयोगासाठी जगभरातील अनेक शास्त्रज्ञ आणि डॉक्टर गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत होते. मनुष्याच्या वार्धक्याला बांध घालता येईल, असे तंत्रज्ञान शोधत होते. मृत्यूपर्यंत माणूस तरुण कसा राहू शकेल, याचा विचार आणि प्रयत्न करीत होते.
इस्राएलमधील तेल अवीव विद्यापीठ आणि समीर मेडिकल सेंटरच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. याचा प्रयोग 64 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 35 जणांवर करण्यात आला. यातील कोणत्याही व्यक्तीला कोणताही गंभीर शारीरिक आजार नव्हता. या 35 जणांना आठवड्यातील पाच दिवस दहा मिनिटांसाठी शुद्ध ऑक्सिजन दिला जात असे.
त्यासाठी या ज्येष्ठ नागरिकांना प्रेशर चेंबरमध्ये पाठविण्यात येत असे. हा प्रयोग तीन महिने सुरू राहिला आणि तीन महिन्यांनंतर जे परिणाम समोर आले, ते शास्त्रज्ञांनाही बुचकळ्यात टाकणारे होते. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, या प्रयोगानंतर ज्येष्ठांचे केवळ वय वाढणेच बंद झाले असे नाही, तर निरोगी पेशींचा विचार करता त्यांची शरीरे एखाद्या 25 वर्षांच्या व्यक्तींसारखी ठणठणीत झाली. म्हणजे केवळ तीन महिन्यांत या शास्त्रज्ञांनी “रिव्हर्स एजिंग’ची प्रक्रिया यशस्वी करून दाखविली. जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या सध्याच्या वयापेक्षा कमी वयाची वाटू लागते, तेव्हा त्याला “रिव्हर्स एजिंग’ म्हणतात. म्हणजेच अशा व्यक्तींचे वय उलट्या दिशेने जाऊ लागते आणि व्यक्ती पुन्हा तरुण दिसू लागते.
शास्त्रज्ञांनी या प्रयोगादरम्यान वय वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या दोन प्रक्रियांवर नियंत्रण मिळविले. प्रत्येकाच्या शरीरात क्रोमोजोम आढळतात. ते शरीरातील डीएनएपासून तयार होतात. या क्रोमोजोम्समध्येच व्यक्तीची संपूर्ण जनुकीय माहिती लपलेली असते. या क्रोमोजोमच्या शेवटच्या टोकाला टेलोमियर असे म्हणतात. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास टेलोमियर हे गाडीला पुढे आणि मागे लावलेल्या बंपरसारखे असतात. क्रोमोजोम हे नेहमी आपली संख्या वाढवीत असतात आणि आपल्याच प्रतिकृती तयार करून ते हे काम करतात.
अशा वेळी जुन्या आणि नव्या क्रोमोजोमची धडक होण्याचा धोका टेलोमियरमुळे टाळला जातो. परंतु वारंवार टक्कर होत राहिल्यास टेलोमियर झिजू लागतात आणि त्यांची लांबी कमी-कमी होत जाते. असे झाल्यानंतर क्रोमोजोम आपल्या प्रतिकृती तयार करू शकत नाहीत. त्याच कारणामुळे नवीन पेशींची निर्मिती बंद पडते. पेशी एक तर मरून जातात किंवा त्यांचा विकास थांबतो आणि येथूनच म्हातारपण सुरू होते. निष्क्रिय होणाऱ्या या पेशी गंभीर आजारांमुळे निर्माण होतात. या पेशी जर सुरक्षित आणि मजबूत राहिल्या तर व्यक्ती कधी वृद्धच होणार नाही.
शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगाच्या माध्यमातून टेलिमियरची लांबी कमी होण्याची प्रक्रिया रोखली. एवढेच नव्हे तर ऑक्सिजन थेरपीमुळे निष्क्रिय होत चाललेल्या पेशींची संख्याही कमी केली. त्यामुळेच या प्रयोगात सहभागी झालेल्या लोकांचे वय वाढण्याची प्रक्रिया थांबली. एवढेच नव्हे तर त्यांचे वय कमी होऊ लागले. ताज्या पेशींच्या निर्मितीमुळे त्यांचे शरीर पुन्हा तरुणांसारखे झाले.
या प्रयोगादरम्यान ज्येष्ठांना ऑक्सिजन सलग 90 मिनिटे दिला जात नसे. मधूनमधून ती प्रक्रिया रोखण्यात येत असे. परंतु शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्याचा आणि कमी होण्याचा परिणाम असा झाला की, शरीराच्या आत सुरू असलेल्या या संघर्षाने या ज्येष्ठांना पुन्हा जवान बनविले. ही ऑक्सिजन थेरपी घरी करू नये असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे, कारण त्यामुळे शरीराचे नुकसानसुद्धा होऊ शकते. काही वर्षांपूर्वी इस्राएलमधील प्रसिद्ध लेखक युवल नोह हरारी यांनी त्यांच्या “होमोडेयस’ या प्रसिद्ध पुस्तकात लिहिले होते की, धार्मिक लोकांसाठी मृत्यू हा भले देवाने घेतलेला एक मोठा निर्णय असेल; परंतु आजमितीस शात्रज्ञांच्या दृष्टीने मृत्यू हा शरीरात येणारा केवळ “टेक्निकल ग्लिच’ म्हणजेच तांत्रिक दोष आहे.
शरीर हे एखाद्या यंत्राप्रमाणे आहे आणि जेव्हा त्यात एखादा तांत्रिक दोष उद्भवतो तेव्हा शरीर निष्क्रिय होते आणि त्यालाच आपण मृत्यू म्हणतो. शास्त्रज्ञांकडून हा तांत्रिक दोष प्रयोगशाळेत दुरुस्त करता येण्याजोगा असून, असे झाल्यास मृत्यू टाळता येईल असे हरारी यांनी लिहिले होते. युवाल नोह हरारी यांच्या पुस्तकाचे “होमोडियस’ हे नावसुद्धा याच गोष्टीकडे लक्ष वेधणारे आहे. आगामी काही दिवसांत माणूस आणि देव यांच्यात काही अंतर नसेल असे त्यांनी म्हटले आहे. लॅटिन भाषेत “होमो’ या शब्दाचा अर्थ “मनुष्य’ असा होतो तर “डेयस’ शब्दाचा अर्थ “देवता’ असा आहे. आता शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत चित्रविचित्र प्रयोग करून हीच गोष्ट खरी असल्याचे दाखवून देत आहेत.
म्हातारपण रोखण्यासाठी आणि मृत्यू टाळण्यासाठी मनुष्य हजारो वर्षांपासून प्रयत्न करीत आला आहे. आयुर्वेद ही 5 हजार वर्षांपेक्षा जुनी चिकित्सापद्धती असून, त्यात वाढते वय रोखण्यासाठी ज्या पद्धतीचा अवलंब केला जातो, तिला रसायन असे म्हणतात. उदाहरणार्थ, जडीबूटींपासून तयार होणारे च्यवनप्राश हे एक रसायन आहे. परंतु आता ऑक्सिजन थेरपीचा वापर करून वयाची गाडी चक्क उलट्या दिशेने वळविण्याची जी किमया इस्राएलच्या शास्त्रज्ञांनी केली आहे, तिला तोड नाही.