जकार्ता: जगभरात करोनाने थैमान घातल्यामुळे निर्माण झालेल्या संकटास अमेरिकाने चीनला जबाबदार ठरविले असल्याने या दोन देशांमधील व्यापार संबंधात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीनमध्ये असलेले अमेरिकन कंपन्यांचे मोठे प्रकल्प इंडोनेशियामध्ये हलवायचे आहेत.
यासंदर्भात डोनाल्ड ट्रम्प आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोकोवि यांच्यामध्ये गुप्त चर्चासुद्धा झाली आहे.
ही माहिती इंडोनेशियन सरकारमधील मंत्री लूहट बिनसार यांनी दिली आहे. इंडोनेशियात औषध क्षेत्रात गुंतवणुकीसंबंधी असलेल्या संधीबद्दल जोकोवि आणि ट्रम्प यांच्यात चर्चा झाली. चीनचे धोरण पटत नसल्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आता इंडोनेशियासोबत आहेत. मला स्वत:ला राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करण्यास सांगितले आहे, असे लूहट म्हणाले.
ही चर्चा दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये केव्हा झाली ते लूहट यांनी जाहीर केलेले नाही. सरकार मध्य जावामध्ये 4 हजार हेक्टरची जमीन तयार ठेवणार आहे. औषध उद्योगासाठी विशेष आर्थिक क्षेत्र इथे उभारण्यात येणार आहे. आम्ही यावर काम करत असून, मध्य जावाच्या गव्हर्नरबरोबर चर्चा झाली आहे, असे लूहट यांनी सांगितले. चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना आपल्याकडे आणण्यासाठी इंडोनेशियाने तयारी केली आहे.