मुंबई – शेअर निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांकडून नफेखोरी होत आहे. परिणामी बुधवारी शेअर बाजार निर्देशांकात काही प्रमाणात घट नोंदली गेली. इन्फोसिस, एचडीएफसी, टीसीएस, महिंद्रा, टाटा स्टील, बजाज फिन्सर्व या बड्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांकाना आधार मिळाला नाही.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 214 अंकांनी कमी होऊन 57,338 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 55 अंकांनी कमी होऊन 17,076 अंकांवर बंद झाला.
असे असले तरी एशियन पेंट्स, नेस्ले, ऍक्सिस बॅंक, टायटन या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. त्यामुळे निर्देशांकाची मोठी हानी टळली असे विश्लेषकांनी सांगितले. वाढलेल्या विकास दराची आकडेवारी काल जाहीर झाल्यामुळे सकाळी शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते. मात्र बऱ्याच गुंतवणूकदारांनी नफेखोरी करण्याचे ठरविले असल्याचे दिसून आले.
त्यामुळे दुपारच्या सत्रात शेअर बाजार निर्देशांक घसरत गेले. राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी सकारात्मक असली तरी ती अपेक्षेइतकी उंचावली नसल्याचे दिसून आले. त्याचबरोबर खासगी गुंतवणूक अजूनही वेग घेत नाही.
त्यामुळे काही गुंतवणूकदार नफेखोरी करण्याच्या मनस्थितीत होते. वाहन उद्योगासमोर सेमीकंडक्टरचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे या उद्योगाच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता वाढू लागली असल्यामुळे वाहन उद्योगाकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. जागतिक बाजारातून भांडवलतेमुळे सकारात्मक संदेश येऊनही भारतीय शेअर बाजारात मात्र विक्री झाली.