- शैक्षणिक गुणवत्ता राखणाऱ्या शिक्षकांना दिल्या बुलेट व ज्युपिटर भेट
हिंजवडी – शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्याला यश मिळवून देणाऱ्या शिक्षकांना स्वखर्चाने बुलेट व ज्युपिटर वाहन भेट देऊन मुळशीच्या सभापतींनी गुणवत्तेसाठी एक वेगळाच “मुळशी पॅटर्न’ राबविला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या इमारतीत या बुलेट प्रदान करण्यात आल्या. शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रोत्साहन देणारा हा अभिनव उपक्रम राबविणारे ते पहिलेच सभापती ठरल्याने उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्यांचे कौतुक केले.
या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, हिंजवडी शाळेचे मुख्याध्यापक हरिभाऊ वाघुलकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
तालुक्यातील अधिकाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत यावेत, तसेच ज्या शाळेतील पाचपेक्षा अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पास होतील, त्या शिक्षकांना स्वखर्चाने बुलेट भेट देऊ, असे सभापती ओझरकर यांनी यापूर्वीच एका कार्यक्रमात जाहीर केले होते. त्यानुसार हिंजवडी व पिरंगुट जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील शिक्षक दिलीप झोळ व शोभा कळमकर (हिंजवडी) व रियाज शेख (पिरंगुट) यांना या दुचाकी भेट देण्यात आल्या.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून, अशा प्रोत्साहनामुळे आगामी काळात मराठी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांना एक वेगळी प्रेरणा मिळेल, असे सभापती पांडुरंग ओझरकर यांनी दै. प्रभातशी बोलताना सांगितले.
हिंजवडी शाळेतील 13, तर पिरंगुट प्राथमिक शाळेतील 8 असे तब्बल 21 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप जठार, गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर, विस्तार अधिकारी सुदाम वाळूंज, सचिन लोखंडे, केंद्रप्रमुख सुरेश साबळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांना लाखो रुपयांच्या बुलेट व महिला शिक्षकांना ज्युपिटर गाड्या दिल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला.सभापतींच्या या दातृत्वाचा मुळशी पॅटर्न यापुढे शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मुख्याध्यापक हरिभाऊ वाघुलकर यांनी व्यक्त केला.