जेजुरीच्या गुरुकुलमध्ये सप्तर्षी अवकाश केंद्राची स्थापना, खगोलशास्त्राचे पुस्तक प्रकाशन
जेजुरी – आधुनिक तंत्र आणि विज्ञानासारखे साहित्य असणाऱ्या अनेक महागड्या श्रीमंत शाळा त्यांच्या मुलांना आधुनिक शिक्षण पद्धतीचे धडे देत असतात. त्यामुळे ही मुले प्रगतीशील होत असतात. मात्र, ग्रामीण मुलांना आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण घेणे तितके स्वस्त नसते, अशा ग्रामीण मुलांकरिता आधुनिक शिक्षण मिळाल्यास ग्रामीण मुलांनी दर्जा क्लब पुणे यांच्या वतीने कै आनंदीबाई खंडागळे पुंढे यांच्या स्मरणार्थ जेजुरीच्या गुरुकुल इंग्रजी माध्यम शाळेत आधुनिक अवकाश निरीक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली.
केंद्राचे उद्घाटन फर्ग्युसनचे माजी प्राचार्य डॉ. व्ही. के. वाघ, रामकृष्ण मठाचे स्वामी एकानंद आणि लायन्स गव्हर्नर ओमप्रकाश पेठे यांच्या हस्ते झाले. यावेळी खास उभारण्यात आलेल्या विज्ञान दालनात भूगोल अभ्यासक शास्त्रज्ञ डॉ. विशाल कुंभार यांनी आधुनिक विज्ञान साहित्याचा वापर आणि माहिती यावर मार्गदर्शन केले.
यावेळी उपप्रांतपाल अभय शास्त्री, हेमंत नाईक, गुरुकुलचे प्राचार्य बाळासाहेब झगडे, संध्याताई नारके, नवचैतन्य पुणेचे बिंदूमाधव मेंडजोगे, श्री मार्तंड देवसंस्थानचे माजी अध्यक्ष डॉ प्रसाद खंडागळे, प्रकाश नारके, विजय सोनवणे, विपुल अभ्यंकर, राहुरी विद्यापीठाचे माजी कुलुगुरू डॉ. देशमुख, विलास लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. नुसत्या डोळ्याने समोरचे दिसते. परंतु विज्ञान निरीक्षण साहित्याने दुर्बिणीच्या सहाय्याने दिव्यचक्षूतुन सर्व जगाबरोबर अवकाशातील तारांगण आपल्याजवळ असल्यासारखे दिसते. यातून अवकाश निरीक्षणाचे धडे मुले गिरवू शकतात, असा विश्वास डॉ. वाघ यांनी व्यक्त केला.
स्वामी एकानंद यांनी मार्गदर्शन केले. गुरुकुल हा जयाद्री परिसराचा भाग असून याच परिसरात सप्तऋषी योगींची तपस्याभूमी असल्याने या निरीक्षण केंद्रास सप्तर्षी, असे नाव देण्यात आल्याचे डॉ. प्रसाद खंडागळे यांनी जाहीर केले. यावेळी डॉ. विशाल कुंभार लिखित ओळख खगोलशास्त्राची या पुस्तकाचे प्रकाशन आणि डॉ प्रसाद खंडागळे यांच्या संकल्पनेतून पक्षी संवर्धनच्या या चिमण्यानो परत फिरा या उपक्रमाचे उद्घाटन आणि प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.