मुंबई : शिवसेना-भाजपला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीनेही छोट्या-छोट्या पक्षांची मोट बांधली आहे. आपल्या या आघाडीत समाजवादी पार्टीला घेण्यास कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्ष यशस्वी झाला आहे.
आघाडीमध्ये समजावादी पक्षाला तीन जागा देऊन आघाडीत सोबत ठेवले आहे. मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगरसह भिवंडी पूर्व आणि औरंगाबाद पूर्व हे मतदारसंघ सपाला देण्यात आले आहेत.समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आघाडीकडे 40 जागांची मागणी केली होती. परंतु, कॉंग्रेसने मानखुर्द शिवाजीनगर ही एकमेव जागा देऊ केली होती. त्यामुळे नाराज झालेल्या अबू आझमी यांनी आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा करत स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर केले होते.
या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आझमी यांची मनधरणी केली. त्यानंतर त्यांना विधानसभेच्या 3 जागा देण्याचे मान्य करण्यात आले. शिवसेना-भाजपला रोखण्यासाठी आपण कॉंग्रेस आघाडीसोबत असल्याचे आझमी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
दरम्यान, आघाडीत छोट्या घटक पक्षांना सोडायच्या जागांवरून घोळ कायम आहे. हा घोळ मिटत नसल्याने आघाडीला आज जागावाटपाच्या घोषणेबाबतची पत्रकार परिषद रद्द करावी लागली. आघाडीचे जागावाटप जाहीर करण्यासाठी कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. परंतु, घटक पक्षांना द्यायच्या जागांवरून अजून चर्चा सुरू असल्याने जागावाटप जाहीर करण्यात आले नाही. आता जागावाटपाची माहिती संयुक्त पत्रकाद्वारे दिली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. घटक पक्षांना योग्य जागा सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.