45 उमेदवार जाहीर; लकी नंबर 9 अंकचा योग साधला
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या 45 उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी सायंकाळी जाहीर केली. मनसेची 27 उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहीर झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली. मात्र, दुसऱ्या यादीतही मनसेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई यांना स्थान मिळालेले नाही.
गेल्या दोन दिवसांत मनसेने 72 उमेदवार जाहीर केले आहेत. राज ठाकरे आणि मनसेसाठी 9 नंबर लकी असल्याचे मानले जाते. पहिल्या यादीत 27 (2+7 =9), दुसऱ्या यादीत 45 (4+5 =9) तर आतापर्यंत एकून 72 (7+2 =9) उमेदवार जाहीर करुन मनसेने आपला लकी नंबरचे गणित सांभाळल्याचे दिसते.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे प्रथमच वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात मनसे उमेदवार देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, मनसेने जाहिर केलेल्या दुसऱ्या यादीत वरळी मतदारसंघातून राज ठाकरे यांनी उमेदवार जाहिर केलेला नाही. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात सुरेश माने यांना उमेदवारी दिली आहे. माने हे बसपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 5 ऑक्टोबर रोजी आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. लोकसभा निवडणूकीत राज ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. त्यामुळे शनिवारी ते आपल्या भाषणात कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.