मुंबई – नैऋत्य मान्सून आज (10 जून) कोकणात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. मान्सून कोकणात दाखल झाल्याने खरीपाच्या पेरणीसाठी मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सरलेल्या वर्षी मान्सून 7 जूनला तळकोकणात दाखल झाला होता. तर यावर्षी मान्सूनला राज्यात यायला तीन दिवस उशीर झाला आहे.
दरम्यान, गुरुवारी हवामान विभागाने पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. कारण कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी अखेर रुळावर आली असून मान्सून आज कोकणात दाखल झाला आहे.
राज्यात विविध ठिकाणी पावसाच्या सरी –
मान्सून कोकणात दाखल झाल्याने राज्यातील विविध भागात पाऊसाच्या सरी बरसल्या आहेत. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांवरील पत्रे उडणे, झाडे कोसळ्याच्या घटना घडल्या आहेत. अकोले, वाशिम, बुलडाणा, पुणे, अहमदनगर यांसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.