महेंद्रसिंह धोनी आणि मोहंम्मद अझहरुद्दीनपाठोपाठ आता आणखीन एका क्रिकेटपटूवर सिनेमा बनवला जाणार आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली उर्फ दादाचा बायोपिक बनवण्याची तयारी करण जोहरने सुरू केली आहे. या संदर्भात करण जोहर आणि सौरव गांगुलीमध्ये अनेक मिटींग झाल्या आहेत.
सध्या या बायोपिकसाठी लीड ऍक्टरचा शोध घेतला जात आहे. आपल्या बायोपिकसाठी एकता कपूरबरोबर चर्चा सुरू आहे. पण अद्याप काहीही निश्चित झालेले नाही, असे गांगुलीनेही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये गांगुलीने आपल्या बायोपिकसाठी हृतिक रोशनच्या नावावर जोर दिला होता. हृतिक हा सौरव गांगुलीचा अगदी आवडता कलाकार आहे. म्हणून त्यानेच आपला रोल साकारावा, असे सौरवने म्हटले होते.
भारतीय क्रिकेटमधील अनेक नाट्यमय घडामोडी आणि बलाढ्य ऑस्ट्रेलियासारख्या संघाला मालिकेत पराभूत करण्याची कामगिरी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील टीमने केली होती. याशिवाय त्याचे ते टीशर्ट हवेत गरागरा फिरवणे कोण विसरू शकेल. आता पडद्यावर हे टीशर्ट फिरवताना कोण दिसेल, ते बघूया.