नवी दिल्ली – बराच काळापासून चर्चेचा विषय बनलेल्या राष्ट्रीय स्तरावरील विरोधकांच्या प्रस्तावित ऐक्यासाठी आता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी 20 ऑगस्टला विरोधी पक्षांच्या नेत्यांची व्हर्च्युअल बैठक बोलावली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन आदी नेते सहभागी होणार आहेत.
भाजपशी राजकीय संघर्ष करण्यासाठी एकवटण्याचा सूर विरोधकांच्या गोटातून आळवला जात आहे. त्यातून विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये गाठीभेटींचे सत्रही सुरू आहे. मात्र, अजूनपर्यंत विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांत कॉंग्रेस पुढे सरसावल्याचे चित्र दिसत नव्हते.
आता सोनियांनी बोलावलेल्या व्हर्च्युअल बैठकीमुळे इतर विरोधी पक्षांचे हात हाती घेण्यास कॉंग्रेसने पुढाकार घेतल्याचे मानले जात आहे. त्या बैठकीचे निमंत्रण बहुतांश विरोधी पक्षांना देण्यात आले आहे. त्यामुळे बैठकीत कोण-कोण सहभागी होणार याविषयीची उत्सुकता बळावली आहे. तृणमूल कॉंग्रेसने त्या बैठकीत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्या पक्षाचे प्रतिनिधित्व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वत: करणार का, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नुकतेच संसदेचे पावसाळी अधिवेशन गदारोळात आटोपले. संसदेतील गदारोळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पेगॅसस पाळत प्रकरण, शेतकरी आंदोलन, महागाई, इंधन दरवाढ, करोना संकटाची हाताळणी आदी मुद्द्यांवरून मोदी सरकार आणि भाजपला संसदेबाहेरही घेरण्याचा विरोधकांचा निर्धार आहे. त्यादृष्टीनेही सोनियांनी बोलावलेल्या व्हर्च्युअल बैठकीला महत्व आहे.