Sonia Gandhi : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोनिया गांधी राजस्थानमधून उमेदवारी दाखल करणार आहे. त्या विजयी झाल्यास पहिल्यांदाच राज्यसभेच्या सदस्या बनणार आहेत. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी त्यांच्यासोबत असतील.
सोनिया गांधी यांना हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेचे उमेदवार करावे, अशी पक्षांतर्गत चर्चा आतापर्यंत होती. परंतु, तेथे काँग्रेस आमदारांची संख्या जास्त नाही. त्यामुळे 70 आमदार असलेल्या राजस्थानमधून त्यांना उमेदवारी देण्याचा विचार समोर आला. सोनिया गांधी सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या लोकसभेच्या खासदार आहेत. मात्र काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या वेळी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे म्हटलं जातं आहे.
प्रियंका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढणार ?
पक्षाच्या बैठकीत सोनिया गांधींना राज्यसभेवर पाठवल्यानंतर प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवावी, यावरही चर्चा झाली. खरे तर रायबरेलीची जागा गांधी कुटुंबासाठी खास आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी 2004 पासून येथून निवडणूक लढवत आहेत. सोनिया गांधींपूर्वी या जागेवरून फिरोज गांधी, इंदिरा गांधी, अरुण नेहरू आदींनी निवडणूक लढवली होती. 1952 पासून काँग्रेसचा येथे फक्त तीन वेळा पराभव झाला.
सोनिया गांधी राज्यस्थानातूनच का लढणार?
सोनिया गांधी यांना कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून राज्यसभा सदस्य बनवण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली होती. राहुल गांधी हे केरळमधून खासदार आहेत आणि सोनिया गांधीही दक्षिण भारतातून राज्यसभेच्या सदस्य झाल्या तर काँग्रेसला फक्त दक्षिण भारताचा पक्ष संबोधले जाईल. असा पक्षाकारांनी तर्क लावल्याने सोनिया गांधी यांना उत्तर भारतातून राज्यसभेत पाठवले पाहिजे. त्यामुळे त्यांना राजस्थानमधून राज्यसभेचे उमेदवार केले जाणार आहे.
राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणूक
देशातील 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणुका होणार आहेत. 27 फेब्रुवारीला ही निवडणूक होणार असून यापैकी राजस्थानमधील तीन जागांवर सदस्य निवडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी प्रक्रियाही सुरू झाली आहे.