टाकळी हाजी – महाराष्ट्र राज्यातील शिक्षक व शिक्षणासंबंधी प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. राज्यातील केंद्रप्रमुखांच्या मंजूर 4860 पदांपैकी सुमारे 60 टक्के पदे रिक्त आहेत.
केंद्रप्रमुख भरती संदर्भातील निर्गमित मागील सर्व शासन आदेश रद्द करून 50 टक्के पदे कार्यरत पदवीधर शिक्षकांमधून व 50 टक्के पदे पदवीधर शिक्षकांमधून विभागीय परीक्षेद्वारे किंवा उच्च अर्हताधारक प्राथमिक शिक्षकांमधून भरण्यात यावीत. शिक्षण विभागातील प्रशासकीय सेवेतील संवर्ग 1, संवर्ग 2 आणि संबंधित पदे कार्यरत प्राथमिक शिक्षकांमधील उच्च अर्हताधारक एम.ए (शिक्षण), एमएड,
नेट- सेट, पीएचडी धारक शिक्षकांमधून भरण्यासाठी सेवाप्रवेश नियमात दुरुस्ती व्हावी, समानता रुजण्यासाठी सर्व मुलांना मोफत गणवेश मिळावेत, शिक्षणसेवकांना सद्यस्थितीत मानधन वाढवून किमान अनुक्रमे 25 हजार व 30 हजार रुपये करावे, जिल्हा परिषदेतील 2010 पासून रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती होण्यासाठी निर्देश व्हावेत,
आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी सकारात्मक विचार करून शासनास शिफारस करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी संघटना प्रतिनिधींना दिले. यावेळी संघटनेचे राज्यसरचिटणीस अनिल पलांडे, राज्य प्रतिनिधी नामदेव गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष शांताराम नेहेरे, खेड तालुका अध्यक्ष नारायण करपे, राजाराम चोरे, दत्तात्रय गडदरे, प्रदीप देवकाते उपस्थित होते.