सासवड, {अमोल बनकर} – समाज माध्यमातून मतदारांच्या घरापर्यंत महाविकास आघाडी, महायुतीसह इच्छुक उमेदवारांचे प्रचारक पोहचत असले तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच समाज माध्यमाचा अतिशय आक्रमकपणे प्रचारासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे प्रत्येकापर्यंत पक्षीय उमेदवाराला पोहोचणे सहज शक्य झाले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर-हवेली, दौंड, बारामती, इंदापूर, भोर-वेल्हा-मुळशी, खडकवासाला या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यामुळे प्रत्येक गावात मतदारांना पोहोचणे शक्य नाही. अशावेळी महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह इच्छुक अपक्ष उमेदवारांनी आक्रमक वापर सुरू केला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा विचार करता सोशल मीडियावर राजकीय पक्षांची सक्रियता बघायला मिळत आहे. मतदान जवळ आल्यानंतर सोशल मीडियावरील प्रचाराचा भडीमार अधिक वाढणार आहे. विविध प्रकारचे फोटो, व्यंगचित्र, व्हिडीओच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे.
मोबाइलच्या आधुनिक तंत्रज्ञानाने प्रचाराची जागा घेतल्याने केवळ एका क्लिकने लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची सुविधा उमेदवारांना उपलब्ध झाली आहे. सोशल मीडियावर प्रचारदूत म्हणून सक्रीय झाला आहे. पदयात्रा, मतदारांशी वैयक्तिक संपर्क, कान्याकोपर्यातील कोपरासभांचे महत्त्व आजसुद्धा कमी झालेले नाही.
तथापि, त्याचबरोबर फेसबुक, व्हॉट्अॅसप, इन्स्टाग्राम यासारख्या माध्यमांतून लोकसभेच्या उमेदवारांचे समर्थक पोस्ट टाकले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर याला अधिक महत्त्व मिळाले आहे. उमेदवार समाजमाध्यमातून मतदारांपर्यत सहज पोहचत आहेत. पक्षाचे तथा स्वत:चे विचार देखील मतदारांना सांगत आहेत.
हायटेक प्रचाराचा नवा फंडा
सोशल मीडिया हा आजकाल सर्वांच्याच ओळखीचा झाला आहे. त्यामुळे निवडणुकीत या आधुनिक तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. काळ बदलला आणि त्यानुसार आचारसंहितेचे नियम अधिक कडक झाले. पारंपरिक प्रचाराची जागा आता समाजमाध्यमाने घेतली आहे.
हायटेक प्रचाराचा नवा फंडा निडणुकीच्या कालावधीत सोशल मीडियावर प्रत्येक तिसरा मेसेज हा राजकीय पक्ष व कार्यकर्ते यांच्याशी निगडित आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पारंपरिक प्रचार जवळपास लुप्त झाल्याचे दिसून येत आहे. काही प्रमाणात लोकनाट्य, पथनाट्याच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. मात्र, सर्वाधिक प्रचाराचा जोर हा समाज माध्यमावर आहे.