कार्ला, (प्रतिनिधी) – श्री एकवीरा देवीची यात्रा रविवारपासून सुरू होत असून त्या संदर्भात लोणावळा पोलीस ठाण्यात श्री एकवीरा पालखी मंडळांची नियोजन बैठक संपन्न झाली. श्री एकवीरा देवस्थान ट्रस्ट वेहेरगाव आयोजित चैत्र सप्तमी सोमवारी (दि. १५) कार्ला गडावर होणाऱ्या आई श्री एकवीरा देवी पालखी सोहळ्याचा मुख्य दिवस असून रविवारपासून (दि. १४) ते मंगळवारदरम्यान (दि. १६) देवीची यात्रा आहे.
यात्रेला आगरी, कोळी, कराडी, कुणबी, सीकेपी व इतर समाजातील लाखो भक्त व भाविक दर्शनासाठी येतात. पालखी व यात्रेचे औचित्यसाधून मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व एकवीरा पालखी मंडळे व मंडळाचे प्रमुख यांची लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे यांनी बैठकीचे आयोजन केले होते.
नियोजन बैठक लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किशोर धुमाळ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे येथे बैठक संपन्न झाली.
यंदा प्रथमच सर्व एकवीरा पालख्यांच्या प्रमुखांना एकत्र आणण्याचे काम एकवीरा भक्त आगरी सेनेचे जयेंद्र खुणे यांनी केले. या वेळी सुरेंद्र पाटील, रोशन पवार, चंद्रकांत पाटील, विशाल डवळे यांंच्यासह पालखी सोहळ्याचे मान्यवर उपस्थित होते. या नियोजन बैठकीमध्ये गडावर होणाऱ्या पालखी सोहळा व यात्रेनिमित्त पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मावळ तहसीलदार, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे यांनी बनवलेल्या नियम व अटी याबाबत किशोर धुमाळ यांनी उपस्थितांना समजून सांगितले.
गडावर शोभेची दारू व फटाके वाजवण्यास बंदी करण्यात आलेली आहे, येणाऱ्या सर्व पालखी मंडळांनी दुपारी एक वाजण्याच्या अगोदर येणे आवश्यक आहे. सर्व पालख्या मंडळांची विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गडावर कचरा, घाण करू नये व स्वच्छता राखावी, तसेच भांडण, तंटा, वाद, होऊन शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करू नये.
पालखी सोहळ्याला व आईचे दर्शन घेणाऱ्या सर्व भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत दर्शन घ्यावे. पायथा ते एकविरा गडावर विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहेत. भक्तांनी पोलीस व स्वयंसेवक यांना सहकार्य करावे. तसेच गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था अग्रसेन हॉटेलच्या बाजूला करण्यात आलेली आहे, असे सांगण्यात आले. जयेंद्र खुणे यांनी सर्वांचे स्वागत करून आभार मानले.