वाल्हे (वार्ताहर) – पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील भोसले आळीमध्ये दरवर्षीप्रमाणे शंभु महादेवाच्या कावडीची ग्रामस्थांच्या वतीने उभारणी करण्यात आली. कावडीची उभारल्यानंतर समाजआरती झाली. त्यानंतर हर हर महादेवच्या जयघोषात कावडीची पारंपरिक ढोल-सनईच्या तालावर आद्यरामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषी मंदिरापासून गावात मिरवणूक काढण्यात आली.
तरुणांनी कावड खांद्यावर उचलून मिरवणुकीस प्रारंभ झाला. याप्रसंगी मनोज भोसले, अनिल भोसले, बाळासाहेब भोसले, अनमोल भोसले, शरद भोसले, विश्वनाथ भोसले, रूपेश भोसले, रमेश भोसले, महेश भोसले आदी उपस्थित होते. नाचणार्यांना उन्हाने त्रास होऊ नये म्हणून ठिकठिकाणी कावडीवर पाणी टाकले जात होते. यावेळी मिरवणुक पाहण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा ग्रामस्थांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी महिलांनी कावडीची पूजा करून शिवदर्शनाचा लाभ घेतला.
दरम्यान, गुरुवारी (दि. 18) कावडीचे शिखर शिंगणापूरच्या यात्रेला प्रस्थान होणार आहे. शुक्रवारी (दि. 19) कावडीचा फलटण येथे मुक्काम होणार असून, शनिवारी (दि.20) बारशीला बरड-आंदरूड मार्गे शिखर शिंगणापूरला कावड मार्गक्रमण करणार असल्याचे वाल्हे चर्मकार संघाचे अध्यक्ष मनोज भोसले व अनिल भोसले यांनी सांगितले.