हैदराबाद: हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर ऍन्ड मॉलेक्युलर बायलॉजी या संस्थेने करोनाची स्वस्तातली चाचणी पद्धत विकसित केली असून या चाचणीला वेळही कमी लागतो. त्या पद्धतीला आता आयसीएमआरच्या मान्यतेची प्रतिक्षा आहे. हे केंद्र केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सीएसआयआर कौन्सिलचाच एक भाग आहे.
त्यांनी करोना चाचणीतील आरएनएन एक्स्ट्रॅक्शनचा भाग वगळून ही चाचणी पद्धत विकसित केल्याने आता कमी वेळात आणि कमी खर्चात करोनाची चाचणी होऊ शकणार आहे. ही चाचणी आता काही मिनीटांमध्येच या पद्धतीने करणे शक्य होणार आहे असे सीसीएमबीचे संचालक राकेश मिश्रा यांनी सांगितले. त्यामुळे आता करोना संशयितांच्या चाचण्या अधिक वेगवान पद्धतीने करता येणे शक्य आहे असे ते म्हणाले.
या पद्धतीतून रूग्णांचे घेण्यात आलेले स्वॅब वाहून नेणेही अधिक सोपे करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या हाताळणीची पद्धतही सोपी झाली आहे असे ते म्हणाले. या नवीन पद्धतीच्या यशस्वीतेच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या असून त्याची माहिती आयसीएमआरला कळवण्यात आली आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर देशात त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करता येणे शक्य आहे असेही त्यांनी सांगितले.