मुंबई – साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा व फिल्ममेकर विघ्नेश शिवन काही महिन्यांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. महाबलीपुरममधील एका रिसॉर्टमध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडला. नयनतारा दाक्षिणात्य अभिनेत्री असली तरी देशभरामध्ये तिचे मोठ्या संख्येने चाहते आहेत. तर विघ्नेश हा नावाजलेला दिग्दर्शक असून त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. चाहत्यांना देखील या दोघांची जोडी प्रचंड आवडते.
दरम्यान, लग्नानंतर चार महिन्यांनी या दोघांनी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. उयीर आणि उलगम अशी या जुळ्या मुलांची नावं आहेत. आता याच मुलांची देखभाल करण्यासाठी नयनताराने एक मोठा निर्णय घेतला असून, अभिनेत्रीचा हा निर्णय ऐकून कदाचित तिचे चाहते नाराज होण्याची शक्यता आहे.
आपल्या मुलांची देखभाल करण्यासाठी आता नयनतारा अभिनयातून ब्रेक घेऊन ती मुलांकडे आणि पतीच्या प्रॉडक्शन हाऊसकडे लक्ष देणार असल्याचं तिने सांगितलं आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल खुलासा केला आहे. असं असलं तरी नयनताराचे बरेच चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.
तिचे काही पूर्ण केलेले आणि शूटिंग झालेले चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये नयनताराचा सर्वात मोठा चित्रपट म्हणजे ‘जवान’चा देखील समावेश आहे. यामध्ये ती अभिनेता शाहरुख खानसोबत मुख्य भूमिका साकारणार आहे. तसेच ती ‘लेडी सुपरस्टार 75’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट तिच्या करिअरमधील 75 वा चित्रपट असून, स्वतः नयनतारा देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.