बिस्बेन – माजी यूएस ओपन विजेत्या डॉमिनिक थिमला शनिवारी ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पात्रता सामना जिंकण्यात यश आले. मात्र हा सामना सर्वांच्या लक्षात राहिला तो, या सामन्यादरम्यान मैदानावर झालेल्या गोंधळामुळे. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियातील सर्वांत विषारी साप टेनिस कोर्टवर आल्याने सामन्यातील खेळ थांबवण्यात आला. सापाला बाहेर काढल्यानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला ज्यात थिएमने बाजी मारली.
हा साप ५० सेंटीमीटर लांब होता आणि ऑस्ट्रेलियातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे. पहिल्या फेरीच्या पात्रता सामन्यादरम्यान २० वर्षीय ऑस्ट्रेलियन जेम्स मॅककेबविरुद्ध थिम सेटने पिछाडीवर होता तेव्हा प्रेक्षकांना कोर्टाजवळ साप दिसला. सुरक्षा कर्मचारी त्वरीत कोर्टात गेले आणि कोर्टवर साप रेंगाळल्याने खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये एकच भीती पसरली.
“मला प्राणी आवडतात, पण हा एक अतिशय विषारी साप होता आणि तो ‘बॉल किड्स’च्या जवळ होता. त्यामुळे ही परिस्थिती खूप धोकादायक होती. असे माझ्यासोबत आयुष्यात कधीच घडलेले नाही, त्यामुळे हा प्रसंग मी कधीच विसरणार नाही.
– डॉमिनिक थिम, ऑस्ट्रेलियन टेनिसपटू
सापाला लवकरच तेथून काढण्यात आले आणि त्यानंतरच खेळ सुरू होऊ शकला. त्यानंतर थीमने तीन मॅच पॉइंट वाचवून टायब्रेकमध्ये दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली. यानंतर ३० वर्षीय खेळाडूने २-६, ७-६ (४), ६-४ असा विजय मिळवला. रविवारी होणाऱ्या अंतिम पात्रता फेरीत आता त्याचा सामना इटलीच्या जियुलिओ झेपिएरी किंवा ओमर जसिका यांच्यातील विजेत्याशी होईल.