नवी दिल्ली – भारतातीलच नव्हे, तर ई-कॉमर्स क्षेत्रातील जगातील अग्रगण्य कंपनी असलेल्या ऍमेझॉनच्या विरोधात देशातील लहान व्यापारी एकवटले असून ऍमेझॉनने केलेल्या विविध कायद्यांचे उल्लंघन या व्यापारी संघटनेने उघड केले आहे. देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या (सीएआयटी) कैटने ऍमेझॉनच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या ऍमेझॉनमुळे देशातील छोट्या उद्योजकांच्या अडचणी वाढल्या आहे. कंपनीने 2012 पासून केलेल्या गैरव्यवहारांची लेखी स्वरुपातील माहिती ईडीकडे सोपवली असल्याची माहिती व्यापारी संघटनांनी दिली आहे.
कैट संघटनेचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी ऍमेझॉन कंपनीकडून होत असलेल्या फसवणुकीचा पाढा वाचला. ऍमेझॉनसारख्या कंपन्यांकडून एफडीआय, फेमा, वेगवेगळ्या प्रेस नोट यांचे सर्रास उल्लंघन होत आहे. ऍमेझॉन सेलर सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि अन्य सहाय्यक कंपन्या तसेच बेनामी कंपन्या ई-कॉमर्स उद्योगांमध्ये सक्रीय आहेत, असा आरोप या संस्थेने केला आहे.
ऍमेझॉनने सातत्याने देशातील व्यापारी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्याचा फटका लहान व्यापाऱ्यांना बसतोय. या व्यापाऱ्यांना एफडीआय आणि फेमा अंतर्गत संरक्षण देण्यात यावे अशी मागणी कंपनीने केली आहे. या प्रकरणात सातत्याने तक्रार केल्यानंतरही ऍमेझॉन कंपनीच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. देशातील सात कोटी लहान व्यापाऱ्यांमध्ये यामुळे फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्याचा दावा कैट संघटनेने केला आहे.
दरम्यान, या प्रकरणात ऍमेझॉन कंपनीने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.