पुणे : शिवनेरी रस्त्यावरील पूलाचे बांधकाम तुर्तास थांबविले

नेहरू रस्त्यावर करणार भविष्यात नियोजन : दैनिक प्रभातमध्ये प्रसिध्द झाले होते याबाबतचे वृत्त

पुणे( प्रतिनिधी) – महापालिकेने मार्केटयार्ड येथील वखार महामंडळाकडून नेहरू रस्ता आणि शिवनेरी रस्त्याकडे जाण्यासाठी वाय आकाराच्या पुलाचे नियोजन केले होते. मात्र, भुसार बाजारातील व्यापाऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या विरोधानंतर शिवनेरी रस्त्यावरील पूलाचे बांधकाम महापालिकेकडून तुर्तास थांबविण्यात आले आहे. नेहरू रस्त्यावरील उड्डाणपूलाचे भविष्यात नियोजन करण्यात येणार आहे. उड्डाणपूलाचे जेवढे काम झाले आहे. तेवढे पूर्ण करण्यात येणार आहे.

महापालिका, बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आमदार माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे प्रशासक मधुकांत गरड, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, नगरसेवक प्रवीण चोरबेले, नगरसेविका मानसी देशपांडे, नगरसेविका राजश्री शिळीमकर, माजी नगरसेविका अनुसया चव्हाण, कार्यकारी अभियंता आंबेकर, दि पुना मर्चंट्‌स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलस भुजबळ उपस्थित होते.

महापालिकेने शिवनेरी आणि नेहरू रस्त्यावर वाय उड्डाणपूलाचे नियोजन केले होते. विशेषत: शिवनेरी रस्त्याकडे वळणाऱ्या पुलामुळे भविष्यात वाहतूक कोंडी आणि अपघातासोबतच या रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यापाऱ्यांना व्यवसाय बंद करावे लागणार आहेत. या पुलाला व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. याबाबत वृत्त मागील दोन दिवसांपासून दैनिक प्रभातमध्ये प्रसिध्द होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.