पळशीच्या सहा युवकांना 22 लाखांचा गंडा

नोकरीचे आमिष दोखवून फसवणूक, म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल

म्हसवड – राज्य शासनाच्या पणन विभागात माझी मोठी ओळख असून नोकरीचे आमिष दाखवून पळशी (ता. माण) येथील सहा युवकांना 22 लाख 40 हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सुदर्शन म्हालू उगले याच्याविरोधात म्हसवड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पळशी गावच्या सरपंच वैशाली करे यांचे पती संजय दामू करे (वय 45) यांची सुदर्शन म्हालू उगले (मु. थोडी पो. नांदूर शिंगोटे ता. सिन्नर) याच्याशी 20-11-2014 रोजी ओळख झाली. त्यावेळी उगलेने “माझी पणन विभागात ओळख आहे, तीन लाख दर चालला आहे,’ असे सांगितल्यावर
संजय यांनी मित्राकडून व हातउसने घेऊन चार लाख जमा केले. त्यावेळी उगले यांनी त्यांना तीन जागा देण्याचे कबूल केले.

त्यानंतर त्यांना तीन लाख रुपये पुन्हा रोख स्वरुपात दिले. उर्वरीत दोन लाख रुपये संजय यांचा भाचा दादा भाऊजी गोरड यांच्या दहिवडी येथील एसबीआय बॅंकेच्या खात्यातून ट्रान्सफर केले. असे नोकरीला लावतो, म्हणून संजयकडून एकूण नऊ लाख रुपये घेतले. तरीही नोकरीला लावले नाही, म्हणून उगलेने फसवणुक केली असल्याची तक्रार संजय करे यांनी दिली.

त्याचप्रमाणे पळशी गावातील भगवान संभु पाटोळे (वय 63) यांच्या मुलास नोकरी लावतो, म्हणून रोख दोन लाख 40 हजार दिले व बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदूर शिंगोटे या खात्यावर दिनांक 22-12-2014 रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या गोंदवले बुद्रुक शाखेतून धनाजी शिवाजी जाधव यांच्या सहीने ट्रान्सफर केले. त्यानंतर काही दिवसांनी समजले की धनाजी शिवाजी जाधव यांच्या भावालाही पणन विभागात नोकरी लावतो, म्हणून धनाजी जाधवकडून रोख दोन लाख 50 हजार व पाच लाख 50 हजार बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदूर शिंगोटे या शाखेतील खात्यावर बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या गोंदवले बुद्रुक शाखेतून जमा केले. असे एकूण आठ लाख रुपये देऊन नोकरी न लावताच फसवणूक केली.

तक्रारदार संजय दामू करे यांचे तीन जण नोकरी लावतो म्हणून नऊ लाख,भगवान संभू पाटोळे यांचा एक जण नोकरी लावतो म्हणून पाच लाख 50 हजार तर धनाजी शिवाजी जाधव यांचे दोन उमेदवार नोकरी लावतो म्हणून आठ लाख घेऊन तिघांचीही नोकरीचे आमिष दाखवून 22 लाख 40 हजार रुपये घेऊन फसवणूक केली असल्याची फिर्याद संजय करे यांनी म्हसवड पोलिसांत दिली आहे. म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार खाडे तपास करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.