शासकीय योजनांच्या नावाखाली लोकांची फसवणूक : पुणे जिल्ह्याच्या या गावातील घटना
शिक्रापूर (पुणे) -हिवरे कुंभार (ता. शिरूर) ग्रामपंचायतमध्ये 2016 ते 2018 दरम्यान नोकरीला असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने ग्रामस्थांना शासकीय योजना तसेच पिक विमा मिळवून देतो असे सांगून बनावट कागदपत्रे जमा करून तब्बल 6 लाख 79 हजार रुपयांची फसवणूक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
गणेश सूर्यकांत आर्वीकर (रा. हिवरे कुंभार) असे या ठगाचे नाव आहे. याबाबत राजेंद्र संपतराव देशमुख (रा. हिवरे कुंभार) यांनी फिर्याद दिली. गणेश आर्वीकर हा हिवरे कुंभार 2016 ते 2018 कालावधीत हिवरे कुंभार ग्रामपंचायतमध्ये हंगामी कामगार म्हणून नोकरीमध्ये होता. त्याने हिवरे कुंभार व पिंपळे खालसा गावातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना कांदा पिक विमा, ऊस पिक विमा तसेच महाराष्ट्र शासन पंतप्रधान कृषी अवजार योजने अंतर्गत अनुदानित ट्रॅक्टर घेऊन देतो अशा भूलथापा मारल्या.
शेतकऱ्यांना शासकीय योजनेचे बनावट कागदपत्र दाखवून ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये गोळा केले. अनेक दिवस उलटूनही शेतकऱ्यांना कोणतेही अनुदान अथवा योजना प्राप्त झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गणेश आर्वीकर याचेकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयामध्ये जाऊन चौकशी केली असता गणेश याने दाखविलेली कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. या घटनेमध्ये गणेश आर्वीकर याने हिवरे कुंभार व पिंपळे खालसा गावातील शेतकऱ्यांची तब्बल सहा लाख 79 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.