Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील परळी येथे आज शासन आपल्या दारी ( Shasan Aplya Dari ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्याकडे कृषीमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी बीडच्या एमआयडीसीमध्ये कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.
आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) उपस्थित होत्या.
यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकाच मंचावर असल्याचं पाहायला मिळालं. हे चित्र पाहून बीडमधील प्रत्येक ग्रामस्थ सुखावला आहे. यावेळी दोन्ही भावाबहिणींनी एकमेकांवर स्तुती सुमने उधळली.
पहिल्यांदाच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकमेकांवर मुक्तकंठाने स्तुती करत होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी “पंकजाताई आणि मी मिळून बीडचा विकास करणार आहोत, अशी घोषणाच दिली.
यावेळी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, “आज दोन मागण्या करतोय. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. प्रसाद योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र परळीचा विकास व्हावा. तीन ऊर्जाशक्तीपीठ म्हणून परळीच्या वैद्यनाथाचे स्थान आहे.
एमआयडीसीची कमी होती ती देखील दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे, कोकणात तुम्ही कोका-कोला नेला, आम्हाला फॅन्टा तरी आमच्या एमआयडीसीमध्ये द्यावेत, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
ते पुढे म्हणाले, ‘आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण काय? हे लोकांनी मला विचारलं. ताईंनी त्यावर सांगितलं. या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे ताई आणि मी एकत्र आहे. बाळा काका आणि सुरेश अण्णा एकत्र आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा एकत्र आहेत. असं सर्व पाहिल्यावर तुम्ही खरंच राज्याचे एकनाथ आहात.
एकनाथामुळे एकी निर्माण होते. हे निश्चित आहे. ताईंनी विकासाची सुरुवात केली. आपण विकासाच्या मध्यावर आहोत. आम्ही दोघे मिळून आम्ही बीडचा विकास करून दाखवू. यापलिकडे दुसरं कोणतं वचन देऊ शकत नाही, असंही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.