कराड दक्षिणमध्ये सर्वाधिक 22 उमेदवार; लोकसभा पोटनिवडणुकीत सात अर्ज दाखल
सातारा – जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल 120 उमेदवार रिंगणात उतरल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सातारा-जावळी, फलटण आणि पाटण हे मतदारसंघ वगळता कोरेगाव, माण, वाई, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण या मतदारसंघांमध्ये बंडखोरी उफाळली आहे. बहुतांश मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती रंगण्याची शक्यता आहे.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने दीपक पवार तर वंचित आघाडी आघाडीकडून अशोकराव दीक्षित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. वाई मतदारसंघात राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील विरुद्ध भाजपचे मदन भोसले अशी पारंपरिक टक्कर होणार असून पुरुषोत्तम जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वंचिततर्फे रामदास महानवर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी 15 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
माण-खटाव मतदारसंघात भाजपच्या जयकुमार गोरे यांच्याविरोधात शिवसेनेने शेखर गोरे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. शरद पवारांच्या सूचनेनुसार निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सर्वपक्षीय “आमचं ठरलंय’ आघाडीतर्फे अनिल देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी सभापती संदीप मांडवे तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. प्रमोद गावडे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
कोरेगावातून राष्ट्रवादीने आ. शशिकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेने महेश शिंदे यांना उमेदवारी दिली असून शिवसेनेच्या रणजितसिंह भोसले यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वंचितने बाळासाहेब चव्हाण यांना उमेदवारी दिली असून या ठिकाणी एकूण 12 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. कऱ्हाड दक्षिणमधून कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी दिली आहे. जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असून वंचितने बाळकृष्ण देसाई यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सर्वाधिक 22 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
कऱ्हाड उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादीने आ. बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात शिवसेनेने धैर्यशील कदम यांना उतरवले आहे. भाजपचे मनोज घोरपडे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वंचितने मराठा समाजातील सुभाषराव पिसाळ यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. फलटणमधून राष्ट्रवादीने आ. दीपक चव्हाण यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असून महायुतीने दिगंबर आगवणे यांना उमेदवारी दिली आहे. वंचितचे अरविंद आढाव हेदेखील रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात 18 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
पाटणमध्ये शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने सत्यजित पाटणकर यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. वंचितने अशोक देवकांत यांना उमेदवारी दिली आहे. पाटणमधून 13 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी उद्या, दि. 5 रोजी होणार असून सोमवार, दि. 7 पर्यंत अर्ज
मागे घेता येणार आहेत. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
जिल्ह्यात विधानसभेच्या आखाड्यात तब्बल 120 उमेदवार
माण, कोरेगाव, कराड उत्तर, वाई येथे उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. कोरेगावात शशिकांत शिंदे यांच्या रॅलीचा जोरदार झंझावात पाहायला मिळाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या रॅलीत सहभागी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही कोरेगावात उपस्थित राहिले. रयत क्रांती संघटनेच्या वतीने ऍड उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी साधेपणाने अर्ज भरला. शक्तिप्रदर्शन व रॅलीच्या निमित्ताने महायुती व आघाडी यांच्यात आरोप व प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. दि. 5 रोजी अर्ज छाननी आणि दि. 7 ऑक्टोबर रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आठ मतदारसंघातील अंतिम राजकीय परिस्थिती मंगळवारनंतर स्पष्ट होणार आहे. महायुती व आघाडी यांना प्रचारासाठी केवळ बारा दिवस मिळणार आहेत.
लोकसभेसाठी सात उमेदवार रिंगणात
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सात उमेदवार उतरले आहेत. उदयनराजे भोसले (भाजप), श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), पुरुषोत्तम जाधव (अपक्ष), अलंकृता बिचुकले (अपक्ष), शिवाजी भोसले (अपक्ष), दीपक उर्फ व्यंकटेश्वर स्वामी (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.