झोपेच्या गोळ्या घेण्याचे दुष्परिणाम

झोपेच्या गोळ्या घेण्यापूर्वी घ्यावयाची काळजी

झोपेच्या गोळ्या घेतल्याने आपल्याला झोप लवकर लागू शकते किंवा दीर्घकाळ झोप शांत लागू शकते. पण, या गोळ्यांचे धोके आणि फायदे व्यक्तीपरत्वे बदलू शकतात. जर तुम्हाला खरोखर चांगली झोप हवी असेल आणि ती तुम्हाला मिळत नसेल, तरीही झोपेच्या गोळ्या हा त्यावरचा चांगला उपाय नक्कीच नाही. तरीही, झोपेच्या गोळ्या अधिक सुरक्षितपणे कशा घ्याव्यात, यासाठी थोडे सल्ले खालीलप्रमाणे…

झोपेच्या गोळ्या घेण्याचे दुष्परिणाम
1. नैराश्य, थकवा, ऊर्जा कमी असल्यासारखे वाटणे, लक्ष केंद्रित करताना त्रास होणे, मूड नसणे
2. प्रचंड डोकेदुखी
3. पोटाचे (गॅस्ट्रोइन्टेस्टिनल) आजार (उदाहरणार्थ – अतिसार किंवा अन्नावरील वासना उडणे)
4. दीर्घकालीन गुंगी (ड्राऊझिनेस) – (झोपेतच राहण्यासाठी मदत करणारी औषधे घेतल्याने असे होते.)
5. काही ठरावीक पदार्थाची अ‍ॅलर्जी येणे
6. झोपेतील वागणुकीत बदल होणे (आपण पूर्ण जागे नसताना वाहन चालवणे किंवा खाणे)
7. दिवसा स्मृतिभ्रंश होणे किंवा काम करताना अडचणी येणे.

गोळ्या घेताना घ्यायची काळजी
1. गरोदर महिला व स्तनपान करणा-या महिलांसाठी झोपेच्या गोळ्या असुरक्षित ठरू शकतात.
2. रात्रीच्या वेळी पडण्याची शक्यता या गोळ्यांमुळे वाढते आणि परिणामी प्रौढ किंवा वयस्कर व्यक्तींमध्ये गुंगीतच पडल्याने जखमा होण्याची भीती असते.
3. रक्तदाब कमी होणे, मूत्रपिंडाचे विकार, अनियमित हृदयाचे ठोके किंवा अन्य आजारपण
4. काही ठरावीक झोपेच्या गोळ्यांची नशा येऊ शकते, त्याचे व्यसनात रूपांतर होऊ शकते. त्यामुळे, औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

1. वैद्यकीय तपासणी करून घ्या
झोपेच्या गोळ्या घ्यायला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टरी सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घ्याव्यात. यामुळे, ब-याचदा तपासण्यांतीच डॉक्टरांना आपल्या निद्रानाशाचे कारण समजू शकते.

2. झोपण्यापूर्वी फार काळ झोपेच्या गोळ्या घेऊ नका
दिवसभराची सर्व कामे पूर्ण करून, अंथरुणात झोपण्यासाठी जाईपर्यंत झोपेच्या गोळ्या घेऊ नका.

3.  योग्य तितका वेळ झोप मिळू शकेल, अशाच वेळी झोपेच्या गोळ्या घ्या
तुम्हाला किमान ७ ते ८ तास झोप मिळू शकेल, याची खात्री असेल, तेव्हाच झोपेच्या गोळ्या घ्या. लहानशी डुलकी हवी असल्यास, झोपेच्या गोळ्या घेऊ नका. (उदाहरणार्थ – प्रवास करताना)

4. दुष्परिणामांचा विचार करा
दिवसा आपण गुंगीत असल्यासारखे वाटले किंवा अन्य दुष्परिणामांची जाणीव झाली, तर आपल्या गोळ्या, औषधे बदलण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.

5. अति मद्यपान टाळा
झोपेच्या गोळ्या आणि मद्य कधीही एकत्र घेऊ नका, हे लक्षात असू द्या. अल्कोहोल किंवा मद्यामुळे गोळ्यांचा सेडेटिव्ह परिणाम वाढू शकतो. परिणामी, तुम्हाला चक्कर येऊ शकते किंवा तुम्ही विचलित होऊ शकता. हे दोन्ही एकत्र सेवन केल्यास, श्वसनाचा आजार होऊ शकतो किंवा आपण बेशुद्ध पडू शकतो. इतकेच नव्हे, तर अल्कोहोल सेवनामुळे खरेतर निद्रानाश बळावू शकतो.

6. डॉक्टरांनी लिहून दिल्यानुसारच झोपेच्या गोळ्या घ्या
काही झोपेच्या गोळ्या अल्पकालीन वापरासाठीच असतात. डॉक्टरांना सांगितल्याशिवाय अधिक काळ ही औषधे घेऊ नयेत. सुरुवातीला डॉक्टरांनी सांगितल्यानुसार गोळ्या घेतल्यावर, आपल्या झोपेवर कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणखी अतिरिक्त गोळ्या घेऊ नका.

7. गोळ्या घेणे काळजीपूर्वक थांबवा
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, गोळ्यांचे वेळापत्रक ठरवा. काही गोळ्या-औषधे कालांतराने बंद करायची असतात. आपल्याला थोडय़ाच काळापुरता, तात्पुरता निद्रानाशाचा आजार असू शकतो, हे समजून घेणे आवश्यक असते. आपण गोळ्या घेणे थांबवल्यानंतरही काही काळ हा त्रास होऊ शकतो, हेही ध्यानात घ्यायला हवे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.