अहमदाबाद :- भारत व पाकिस्तान सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचा नवोदित सलामीवीर फलंदाज शुभमन गिलसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. आयसीसीने प्रत्येक महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूला पुरस्कार देण्याचे सुरू केल्यावर यंदाच्या महिन्यातल हा पुरस्कार गिलला जाहीर झाला आहे.
सप्टेंबर महिन्यातील सर्वात यशस्वी पुरुष क्रिकेटपटू म्हणून गिलचा गौरव करण्यात आला आहे. त्याने गेल्या महिन्यात 80 च्या सरासरीने तब्बल 480 धावा फटकावल्या आहेत. त्यात दोन शतकी खेळींचा समावेश आहे. बांगलादेशविरुद्ध 121 तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 104 धावा केल्या होत्या.
या पुरस्कारांच्या शर्यतीत गिलने महंमद सिराज व डेव्हीड मलान यांना मागे टाकले. गिलने यंदाच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत 302 धावा केल्या. या स्पर्धेत गिल हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तसेच त्याने भारतात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत गिलने सप्टेंबर महिन्यातही तीन अर्धशतके देखील फटकावली आहेत. गिलने आजवरच्या कारकीर्दीत 35 सामन्यांत 1917 धावा करून एकदिवसीय सामन्यांतील एक विक्रमही साकार केला आहे. आयसीसीच्या पुरुष क्रिकेटपटूंच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
डेंग्युमुळे काही सामने हुकले…
गिल याला सध्या भारतात सुरू असलेल्या एखदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतील काही सामन्यांना मुकावे लागले. त्याला डेंग्यू झाल्यामुळे तो आज (शनिवार) पाकिस्तानविरुद्धच्या साम्यात तरी खेळेल का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो गुरुवारी अहमदाबादला दाखल झाला तसेच त्याने भारतीय संघासह काहीकाल सरावही केला आहे. मात्र, त्याचा अंतिम संघात समावेश होणार का याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.