ब्रिटनमध्ये तब्बल 65 लाख रुग्ण उपचाराच्या वेटिंग लिस्टवर
लंडन : गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये करोना महामारीमुळे जगाच्या पाठीवरील अनेक देशांमधील आरोग्य व्यवस्था सुधारली असली तरी युरोपबाबत मात्र विपरीत अनुभव येत आहे. संपूर्ण युरोपमध्ये तब्बल पाच लाख डॉक्टरशी टंचाई असून युरोपमधील आरोग्य यंत्रणाच आजारी पडली आहे.
एकट्या ब्रिटनमध्ये तब्बल 65 लाख रुग्ण उपचारांच्या वेटिंगलिस्ट वर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. स्पेनसारख्या देशातही एखादी साधी शस्त्रक्रिया करण्यासाठी तब्बल एकशे तेवीस दिवस वेटिंग करावे लागत आहे. युरोपमधील तज्ञ या परिस्थितीला करोना महामारीला जबाबदार धरत आहेत या कालावधीमध्ये युरोपमधील आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त भर पडल्याचे विपरीत परिणाम आता समोर येऊ लागले आहेत.
गेल्या काही महिन्यांमध्ये युरोपमधील अनेक देशांमध्ये डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत असल्याने अनेक वेळा रुग्णांनी डॉक्टर्स आणि नर्स यांना लाच दिल्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत.
युरोपियन कॅन्सर ऑर्गनायझेशनने दिलेल्या माहितीप्रमाणे, युरोपमध्ये तब्बल 10 कोटीपेक्षा जास्त कर्करोगाच्या चाचण्या होऊ शकलेल्या नाहीत. जर्मनी स्वित्झर्लंड फ्रान्स स्पेन इटली यासारख्या महत्त्वाच्या देशांचा समावेश असलेल्या युरोपमधील आरोग्य यंत्रणा सुधारावयाची असेल तर आगामी कालावधीमध्ये 24 लाख कोटी पेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक करावी लागेल अशी माहितीही मिळत आहे.