नवी दिल्ली – राजधानीत होणार असलेली विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धा देखील करोनाच्या धोक्यामुळे रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही स्पर्धा रद्द करण्यासाठी भारतीय रायफल संघटनेवर सातत्याने दबाव येत आहे. करोनामुळे या आठवड्यात होणारी म्युनिच येथील स्पर्धा रद्द करण्यात आल्याने दिल्लीतील स्पर्धेवरही करोनाचे सावट आले आहे.
ही स्पर्धा 15 ते 26 मार्च या कालावधीत होणार होती. मात्र, स्पर्धेला पुढे ढकलण्यात आले. त्यावेळी ही स्पर्धा दोन गटात घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. रायफल व पिस्तूल प्रकारातील स्पर्धा येत्या 5 ते 12 मे या कालावधीत तर, शॉटगनची स्पर्धा येत्या 2 ते 9 जून या काळात घेण्याचे जाहीर करण्यात आले होते.
मात्र, म्युनिचमधील स्पर्धा रद्द झाल्याने संघटनेवरही दबाव येत आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघानेही ही स्पर्धा व्हावी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने खेळाडूंच्या आरोग्याला महत्त्व देत ही स्पर्धाही रद्द करावी अशी मागणी होत आहे.