- नेम चुकल्याने दुर्घटना टळली
पिंपरी – भावासोबत झालेल्या किरकोळ वादातून एका भंगार व्यावसायिकाला गोळ्या घालून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुदैवाने आरोपींचा नेम चुकल्याने दुर्घटना टळली. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री पावणे बाराच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथे घडली.
प्रशांत रमेश कोळी (वय 32), सुरज पवार (वय 28), राहुल सोनकांबळे (वय 28, तिघे रा. सेक्टर क्रमांक 22, निगडी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भरत ज्ञानोबा थोरात (वय 28, रा सेक्टर क्रमांक 22, आझाद चौक, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी भरत हे भंगारचा व्यवसाय करतात. त्यांच्या भावाचा आरोपींशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. दरम्यान, रविवारी रात्री भरत हे मित्रांसोबत गप्पा मारत थांबले असताना आरोपी त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. परंतु नेम चुकल्याने भरत व त्यांचे मित्र वाचले. फायरिंगचा आवाज ऐकून नागरिकांनी घराच्या खिडक्या, दरवाजे बंद करून घेतले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, दरोडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, सहाय्यक निरीक्षक व्ही एम धुमाळ, एल एन सोनवणे या अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली.
सहा तासात दोघे जेरबंद
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काही पथके तयार करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्यातील हवालदार सतीश ढोले यांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तळवडे, परिसरात सापळा रचून सुरज पवार आणि राहुल सोनकांबळे या दोघांना अटक केली.