- ऊसाच्या शेतातील 73 झाडे जप्त
देहूगाव – देहूगाव काळोखे मळा येथे उसाच्या शेतात लागवड केलेल्या पस्तीस हजार रूपये किमतीची अफूची 73 झाडे जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी शेतकऱ्याला अटक केली आहे.
जालिंदर विनायक काळोखे (वय 60, रा. काळोखे मळा, विठ्ठलनगर, देहूगाव) असे अटक करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उसाच्या फडात अफूची शेती केल्याची माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार यांना मिळाली. त्यानुसार देहूरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गज्जेवार, पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे, पोलीस नाईक संतोष जाधव, विजय गेंगजे आदींनी काळोखे यांच्या शेताची पाहणी केली.
या पाहणीत उसाच्या शेतात लागवड केलेल्या 73 झाडे जप्त केली. शेतातील मातीच्या नमुने जप्त केले आहेत. या प्रकरणी देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.