पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातून पोलीस निरीक्षक बोलत असल्याची बतावणी करून इच्छीतस्थळी बदलीसाठी पोलीस आयुक्तांच्या नावाखाली पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिला पोलिस हवालदाराकडून पाच हजार रूपये उकळल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी संबंधित महिला पोलीस हवालदाराने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पाटील या नावाने फोन करणाऱ्या भामट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी भोसरी ठाण्यातील पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी माहिती दिली. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. 25) पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षातून निरीक्षक पाटील बोलत असल्याचे सांगत एकाने फोन केला. पोलिस ठाण्यात तीन किंवा पाच वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी त्याने मागितली. नियंत्रण कक्षातून फोन आल्याने संबंधित कर्मचाऱ्याने देखील तातडीने तीन ते पाच वर्ष कालावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी संबंधिताला व्हॉट्सअपवर पाठवून दिली. त्यानंतर आरोपीने या यादीतील तीन ते चार कर्मचाऱ्यांना फोन करून तुमचा कालावधी पूर्ण झाला आहे. आज बदलीचे आदेश निघणार आहेत. तुमची इच्छीतस्थळी बदली करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. पैसे न दिल्यास साहेबांची स्वाक्षऱी होणार नाही, असे धमकावण्यात आले.
या सर्व प्रकारानंतर गडबडून गेलेल्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला. हा सर्व प्रकार कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितला. त्यानंतर पडताळणीसाठी महिला पोलीस हवालदाराने पाच हजार रूपये पाटील यांच्या मोबाइल क्रमांकांवर ऑनलाइन पाठवले.आता तो मोबाइल बंद लागत आहे.
गुन्हा दाखल करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश
इच्छीतस्थळी बदलीसाठी पोलीस आयुक्तांच्या नावानेच पैसे उकळण्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून त्वरीत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणी, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.