शिवशाहीची दरमहा तपासणी सक्‍तीची

अंमलबजावणी करा; अन्यथा दंडात्मक कारवाई

पुणे –
एसटी महामंडळाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला “शिवशाही’ बसेस अडचणीत आल्या आहेत. या बसेस मार्गावरच बंद पडत असल्याने महामंडळाची विश्‍वासार्हताच धोक्‍यात आली आहे. त्यातूनच महामंडळाचा महसूलही घटला असून प्रवासीही दुरावत चालला आहे. त्यामुळे या प्रकाराची महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे, त्यानुसार यापुढील कालावधीत या बसेसची तज्ज्ञांच्या माध्यमातून दरमहा तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्य कार्यालयाने सर्व विभागीय कार्यालयांना सूचना दिल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

खासगी बसेसच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाने अश्‍वमेध आणि हिरकणी बसेससह शिवशाही ताफ्यात आणल्या आहेत. महामंडळाच्या ताफ्यात सध्या राज्यभरात 900 शिवशाहीच्या बसेस आहेत. या बसेस आरामदायी आणि वातानुकुलित असल्याने प्रवाशांचाही या बसेसला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, त्यातूनच महामंडळाचा महसूलही अपेक्षेपेक्षाही अधिक वाढला होता. मात्र, या बसेसची बांधणी उत्तम असली तरीही बसेसमध्ये तांत्रिक दोष असल्याने या बसेस पहिल्यापासूनच या बसेसमध्ये बिघाड होत आहेत. त्यामुळे या बसेसची देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. तरीही या बसेसमधील बिघाड अद्याप कमी झालेले नाहीत.

विशेष म्हणजे बसेस मार्गावरच बंद पडत आहेत. गेल्या महिनाभराच्या कालावधीत राज्यभरातील तब्बल दोनशे मार्गावर बसेस बंद पडल्या आहेत. त्यामुळे या बसमधील प्रवाशांनी थेट महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे लेखी आणि ई- मेलच्या माध्यमातून तक्रारी नोंदविल्या आहेत. तसेच महामंडळाच्या आणि विशेषत: या बसच्या कारभाराच्या संदर्भात या प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकाराची महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे, त्यानुसार या बसेसची दरमहा तपासणी तसेच देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे महामंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.