मुळशीत शिवसेनेच्या मतदानात घट

पिरंगुट – भोर विधानसभा निवडणुकीत मुळशी तालुक्‍यात शिवसेनेच्या मतदानात घट झाली. 2014च्या तुलनेत यावेळी शिवसेना उमेदवारास केवळ 1591 मतांची आघाडी मिळाली आहे. तर कॉंग्रेसला गतवेळीपेक्षा जवळपास 21 हजार 146 अधिक मते मिळाली आहे. त्यामुळे एकनिष्ठ असलेल्या शिवसेनेला आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे.

राज्यातील दुर्गम असा भोर विधानसभा मतदारसंघ आहे. यामध्ये भोर, वेल्हा आणि मुळशी या तीन तालुक्‍यांचा समावेश आहे. मुळशी तालुक्‍यातून एकूण 84 हजार 991 मतदान झाले होते. त्यापैकी शिवसेनेच्या कुलदीप कोंडे यांना 36 हजार 572, कॉंग्रेसचे संग्राम थोपटे यांना 34 हजार 981, अपक्ष आत्माराम कलाटे यांना 5661, वंचितचे भाऊ मरगळे यांना 3456, मनसेचे अनिल मातेरे यांना 2283, संभाजी ब्रिगेडचे पंढरीनाथ सोंडकर यांना 562, तर अपक्ष मानसी शिंदे यांना 482 मते मिळाली तर 994 जणांनीनोटाचा वापर केला.

2014 मध्ये मुळशीतून शिवसेचे कुलदीप कोंडे यांना 24 हजार 989 एवढी तर कॉंग्रेसचे संग्राम थोपटे यांना 13 हजार 835 एवढी मिळाली होती. त्यामुळे कुलदीप कोंडे यांना मुळशीतून 11 हजार 154 मतांची आघाडी मिळाली होती. यावर्षी मात्र केवळ 1591 मतांचीच आघाडी कोंडेना मिळाली आहे. यावर्षी शिवसेनेची उमेदवारी मुळशी तालुक्‍याला मिळणार अशी आशा कार्यकर्त्यांना होती. त्यातच शिवसेनेची उमेदवारी मिळणार या हेतूने राष्ट्रवादीचे आत्माराम कलाटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला; मात्र प्रत्यक्षात अनेक नाट्यमय घडामोडीनंतर उमेदवारी कुलदीप कोंडे यांना मिळाली. त्यामुळे नाराज आत्माराम कलाटे यांनी बंडखोरी केली.

त्यातच सेनेच्या अनेक नेत्यांनी प्रचारापासून स्वतःला दूर ठेवले. कॉंग्रेसचे थोपटे यांना 2009 मध्ये 8000, 2014 मध्ये 14,000 तर आता जवळपास 34,000 मते मिळाली. तालुक्‍यात आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांनी काम करीत थोपटे यांना ही आघाडी मिळवून दिली. मात्र शिवसेनेला हे साध्य करता आले नाही.

एकंदरीत चित्र पाहता तालुक्‍यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकदिलाने आघाडी धर्माचे पालन करीत थोपटेंना मतदान केले. याउलट शिवसेनेत झालेली बंडाळी, गटतट, मतभेद, प्रचारापासून दूर राहिलेले नेते यामुळे गतवेळीपेक्षा शिवसेनेला म्हणावी तशी आघाडी मिळविता आली नाही. परिणामी शिवसेना पक्षाला तालुक्‍यात आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here