सावधान! ‘नोटा’चा वापर वाढलाय

दौंडच्या जागेवर रमेश थोरात यांना ‘नोटा’चा फटका : राहुल कुलांना तारले 

पुणे – जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत 14 हजार 994 मतदारांनी “नोटा’चा  वापर केला आहे. हे प्रमाण सरासरी पाऊण टक्‍का आहे. दहा मतदारसंघात दौंड आणि इंदापूर मतदारसंघ वगळता आठ मतदारसंघात मतदारांनी एक हजारी टप्पा ओलांडला आहे. त्या तुलनेत पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात 25 हजारांवर नोटांचा वापर झाला आहे.

पिंपरी महापालिका हद्दीतील तीन विधानसभा मतदारसंघात 11 हजार “नोटा’चा वापर केला आहे. दरम्यान, कमी आकडेवारी असलेल्या नोटाचा फटका जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांना बसला आहे. त्यांचा 746 मतांनी पराभव झाला.

विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भाग असलेल्या जिल्ह्यातील दहा विधानसभा निवडणुकीत नेहमीच तुल्यबळ लढती होतात. तोडीस तोड उमेदवार असल्यामुळे चुरस असते. मतदान करताना कोणाताही उमेदवार लायक नाही, यासाठी मतदारांना ईव्हीएममध्ये नोटाचा अधिकार दिला आहे. त्याचा वापर ग्रामीण भागात फारसा होत नाही. मात्र, या निवडणुकीत नोटाने एक हजारी आकडा पार केला आहे. गेल्या दहा वर्षांत मतदार सजग झाले आहेत. विविध सामाजिक संस्थांकडून नोटाचा वापर टाळण्यासाठी प्रबोधन करण्यात आले होते. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाला नाही, हे पुणे शहर, जिल्हा, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील दहा मतदारसंघात शिरूर, पुरंदर, भोर मतदारसंघात नोटांचा पर्याय मतदारांनी निवडला आहे. यात शिरूर मतदारसंघात 1827 नोटांचा वापर झाला आहे. पुरंदर- हवेली मतदारसंघात 1808 नोटांवर बोट ठेऊन कोणत्याही उमेदवारांना पसंती दिली आहे. भोर विधानसभा मतदारसंघात 1827 नोटांचा पर्याय वापरण्यात आला आहे. एकतर्फी निवडणुकीत असलेल्या बारामती मतदारसंघात 1579 नोटांचा वापर झाला आहे. खेड- आळंदी विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढतीत 1707 मतदारांनी नोटाला आपलेसे केले आहे. या मतदारसंघात शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस, अपक्ष अशी तिरंगी लढत झाली होती.

जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस, अपक्ष आशा बुचके यांच्यातही तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत मतदारांनी 1492 नोटाला पसंती दिली आहे. आंबेगाव- शिरूर मतदारसंघात 1 हजार 616 नोटांचा वापर करून नापसंती मतपेटीतून व्यक्‍त केली. गेल्या 25 वर्षांपासून भाजपचा गड असलेल्या मावळ मतदारसंघातही अटीतटीची लढत झाली. यात 1 हजार 490 मतदारांनी नोटांचा वापर करून चकीत केले आहे.

इंदापूर मतदारसंघात सर्वाधिक कमी आकडेवारी – 
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप यांच्यातील चुरशीची लढत लक्षवेधी ठरली. तुल्यबळ लढतीत दोन दिग्गज उमेदवार आमने- सामने होते. आमदार दत्तात्रय भरणे आणि भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यातील दमदार लढतीत संवेदनशील आणि जागरूक मतदारांनी सर्वात कमी म्हणजे 731 मतदारांनी नोटांचा वापर केला आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघात ही सर्वात कमी आकडेवारी आहे. येथील मतदारांनी सारासार विचार करून दोन्ही उमेदवारांपैकी एकाला पसंती दिली आहे.

..जर तरच्या शब्दांत दौंडच्या जागेवर “नोटा’ घातक
जिल्ह्यातील दहा मतदारसंघात मतदारांनी इंदापूर आणि दौंड मतदारसंघ अपवाद वगळता आठ मतदारसंघात एक हजारी टप्पा ओलांडला आहे. काही ठिकाणी दीड हजारांवर गेला आहे. त्यामुळे जर तरच्या शब्दांत या नोटांमुळे दौंड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रमेश थोरात यांना घातक ठरले. तर भाजपचे उमेदवार राहुल कुल यांना तारले, असेच म्हणावे लागेल. या निवडणुकीत थोरात यांना 746 मतांनी पराभव झाला आहे. त्यातच 917 मतदारांनी नोटांचा वापर केल्यामुळे शेवटच्या टप्प्यात थोरात यांना फटका बसल्याची चर्चा सुरू झाली.

21 मतदारसंघात 51 हजारांवर “नोटा’
पुणे शहरासह जिल्ह्यात 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. यात पुणे शहरातील आठ मतदारसंघात 23 हजार 458 मतदारांनी नोटांचा पर्याय स्वीकारला आहे. या सर्व मतदारसंघात सरासरी 1.04 ते 1.89 टक्‍के नोटांचा वापर झाला आहे. तसेच पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघात 12 हजार 756 मतदारांनी नोटांवर बोट ठेवले. या तीन मतदारसंघातील नोटांची सरासरी टक्‍केवारी 1.38 ते 2.11 इतकी आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी मतदारांमध्ये नोटांचा वापर वाढला आहे. हे निकालानंतर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे..

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.