तामिळनाडूत ऐन विधानसभा निवडणुकीआधी मोठी राजकीय खळबळ; शशिकला यांचा राजकारणातून ‘संन्यास’

चेन्नई – तामिळनाडूत ऐन विधानसभा निवडणुकीआधी मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय आणि चीन्नमा नावाने राज्यातील लोकांच्या परिचयाच्या असलेल्या शशिकला यांनी थेट राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

शशिकला यांनी याबाबत एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी आपल्या समर्थकांना आणि अद्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आणि द्रमुक पक्षाला पराभूत करण्याचे आवाहन केले आहे.

तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेचे सरकार बनावे म्हणून मी राजकारणातून संन्यास घेत आहे. मी पक्षाच्या विजयासाठी देवाकडे आणि माझी बहिण जयललिता यांच्याकडे प्रार्थना करते. मी नेहमीच तामिळनाडूच्या जनतेच्या भल्यासाठी काम करत राहिल आणि जयललिता यांच्या मार्गावर चालत राहिल.

आता कार्यकर्त्यांनीही एकजूट दाखवून पक्षाला विजयी करावे असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
तामिळनाडूसह देशातील 4 राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेशात निवडणुका होत आहेत. या सर्व निवडणुकांचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तामिळनाडूचा सत्ताधारी पक्ष अद्रमुकने राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश केला होता. भाजप आणि अद्रमुक तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढले.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांनी चेन्नईत पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली होती. तामिळनाडूतील एकूण 39 लोकसभेच्या जागांपैकी भाजपला पाच जागा देण्याचा निर्णय झाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.