शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे- देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

पुणे  -स्वत:च्या अंगावर आले, की दुसऱ्याला द्रोही म्हणायचे. कोणाच्या म्हणण्याने आम्ही महाराष्ट्र द्रोही’ होत नाही. जनता आमच्या पाठीशी असल्याचे भाजप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगत शिवसेना म्हणजे महाराष्ट्र नव्हे, हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजून घ्यावे,’ असा सल्ला देत फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 

पुणे विभाग पदवीधरचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख आणि शिक्षक मतदार संघातील भाजप पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ फडणवीस हे पुण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, हेमंत रासने, धीरज घाटे, ओबीसी मोर्चाचे योगेश टिळेकर, गणेश बिडकर उपस्थित होते.

आम्हीही महाराष्ट्रातले असून, आमच्या पाच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राला पहिल्या स्थानावर आणले याचा मला अभिमान आहे. राज्य सरकारबाबत आज मोठा असंतोष पाहायला मिळतो. करोना काळात निष्क्रियता, दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही आणि अतिवृष्टीतील नुकसान झालेल्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. काही ठिकाणी तर पंचनामे झाले नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तसेच वीजबिलाच्या सवलतीबाबत घुमजाव केले. त्यावरून सरकारमध्ये समन्वय नाही, त्याच्या कुरघोडीच्या राजकारणात सामान्य जनता भरडली जात आहे.’

सरकारच्या वेळकाढूपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यास उशीर होत आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया थांबली असून, त्याचा फटका मराठा समाजातील विद्यार्थ्यांबरोबर अन्य समाजातील विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे आता थांबता येणार नाही. त्याचवेळी मराठा समाजाला कुठे स्थान देणार हे देखील स्पष्ट होणे आवश्‍यक आहे. – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

तीनशे कोटींचा घोटाळा; आरोपांबाबत बनवाबनवी
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या वतीने विकासकामांसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत 300 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. माजी मुख्यमंत्री यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आले होते. याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध होऊनही माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी भाषणात याबाबत काहीही खुलासा केला नाही. पत्रकारांनी याबाबत विचारले असता पुण्याच्या पत्रकार परिषदेत बोलू, असे म्हणून विषय टाळला. तर पुण्यात पोहोचल्यानंतर मी आताच पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आलो आहे, असे सांगत फडणवीस यांनी सोयीस्कररित्या या मुद्द्याला बगल दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.