नागपूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच, 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले होते. तर, छत्रपतींची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवरही मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला नमन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी यावेळी शिवनेरीवर दाखल झाले होते.
दरम्यान, राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव मोठया आनंदाने साजरा करण्यात आला असून अनेक ठिकाणी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले होते. सध्या अश्याच एका रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, या व्हायरल व्हिडिओमुळे तब्ब्ल नऊ तरुणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथील हिंदवी समाज समुहाने रॅली काढली होती. पारडी येथील रामभूमी सोसायटी ते मोमीनपुरा, गोळीबार चौक-वाड्यावर असलेल्या गांधी गेटजवळ रॅली संपली. या रॅलीत सुमारे 70-80 दुचाकींचा सहभाग होता. मात्र, ही रॅली मोमीनपुरामधून जाताच रॅलीत सहभागी अनेक तरुणांनी तलवारी काढून नाचवायला सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.
आणि त्यानंतर पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे नऊ तरुणांवर बेकायदेशीर शस्त्रे घेऊन फिरणे, हुल्लडबाजी करणे, दंगामस्ती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अजून तिघांचा शोध घेत आहेत. रॅलीमध्ये हुल्लडबाजी आणि दंगामस्ती केल्याप्रकरणी या तरुणांना ताब्यात घेतलं आहे. सध्या सगळीकडे या रॅलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, सामान्य नागरिक देखील यावर आपली प्रतिक्रिया देत आहे.