माझा बालमित्र जगजंपी उर्फ जग्गू नुकताच एका सरकारी कंपनीतून रिटायर झाला आहे. त्यामुळे बॅंक खात्यात प्रॉव्हिडंट फंड वगैरेची बरीच रक्कम जमा झाली असणार. हाताशी पैसा नसेल तेव्हा मराठी कारकून फावल्या वेळात उदबत्त्या, दिवाळीत फटाके आणि वर्षारंभी कॅलेंडर्स विकतो. पैसे मिळायला लागले की त्याला कविता लिहाव्याशा आणि स्वतःच्या पैशांनी छापाव्याशा वाटतात. जास्त पैसे मिळाले की स्वतःचा दिवाळी अंक प्रकाशित करायची इच्छा होते. फार जास्त पैसे मिळाले की सिनेमा काढावासा वाटतो. मराठी कारकुनाला खिशात पैसे नसताना किंवा असताना बांधकाम व्यवसाय, संगणक निर्मिती, राजकारण वगैरेत झेप घ्यावीशी वाटली असे उदाहरण ऐकिवात नाही. नगरसेवक, आमदार वगैरे होणारी, खेड्यात साखर कारखाने उभारणारी, खासगी शाळा-कॉलेजेस काढणारी मराठी माणसे निराळी असतात. ते जाऊ देत.
जग्गू माझ्याप्रमाणेच कारकुंडा होता. त्याला सेवानिवृत्तीनंतर फारच जास्त पैसे मिळाले असणार. परवा तो आला आणि मला विचारू लागला, मला एक सल्ला देतंस काय? मी आता रिटायर झालेलं. माझं बायको नंदिनी आणि मी दिवसभर टीव्ही बघतं.
मुलगा काय करतोय सध्या?
सध्या देशात मंदी असतंय. नोकऱ्या मिळत नसतंय. मुलगा बेकार हिंडतंय. ते माझ्या मागं लागलंय की आपण सिनेमा काढू. मुलगा हिरो आणि त्याचं गर्लफ्रेंड हिरोईन होऊ म्हणतंय. दोघं सिनेमात फुकट काम करणार की. मी आणि नंदिनी पण काम करू म्हणतंय. तुझं काय सल्ला?
मला सिनेमातलं काय कळतंय रे. तुला तरी कळतंय का?
अर्थशास्त्रातलं काही समजत नसलेलं पुढारी लोक पण हल्ली त्यावर बोलतंय, निर्णय घेतंय. मग मी काय पाप केलंय? तू लेखक असतंय. तू आमच्यासाठी गोष्ट लिही. आम्ही तुला पैसे देतंय. शूटिंगचं एवढं काय अवघड नाही बघ. माझं, नंदिनी आणि मुलाचं तिघांचं मोबाइल चांगलं असतंय. आम्ही मोबाइलवरच शूटिंग करणार. सगळं सिनेमाचं शूटिंग झालं की लग्नाचं व्हिडिओ शूटिंग करणारे लोक असतंय. त्यांच्याकडं जाऊन एडिट करून फायनल सिनेमा बनवणार. स्वस्त आणि मस्त. हाय काय आणिक नाय काय. आता तू फक्त आम्हाला स्टोरी लिहून दे आणि सिनेमा चालायला पाहिजे त्यासाठी जंक्शन आयडिया सांग.
स्टोरी लिहून देतो आणि आयडिया पण देतो. स्टोरीचे आणि आयडिया सांगण्याचे वेगवेगळे पैसे पडतील. कबूल आहे?
कबूल की. मी देशप्रेमावर स्टोरी लिहून देतो. म्हणजे सिनेमा नक्की हिट होईल. एक शत्रूचा गुप्तहेर असतो. गुप्तहेराची भूमिका मी करतो. नायक पोलीस इन्स्पेक्टर (म्हणजे तू) आणि नायिका पीएसआय (म्हणजे नंदिनी वहिनी) त्याच्याशी लढतात. पण मी तुम्हाला दोघांना ठार करतो. मग सिनेमाची इंटरव्हल होते. इंटरव्हलनंतर तुमचा मुलगा मोठा झालेला दाखवायचा. तो आणि त्याची गर्लफ्रेंड मला ठार करतात. तुमच्या दोघांच्या फोटोला हार घालतात आणि मग त्यांचं लग्न होतं. मस्त स्टोरी आहे \नुसती मस्त नाही. स्वस्त आहे. सिनेमाच्या सुरुवातीला तू तुझ्या घरी पेपर वाचत असताना मी तुला फोन करतो की आज मी जेलमधून सुटलो आहे आणि तुझा खून करणार. तू हे नंदिनी वहिनीला सांगत असताना मी घरात घुसतो. आपली मारामारी होते आणि मी तुम्हाला दोघांना ठार करतो. तुझा छोटा मुलगा तेव्हा बाथरूममध्ये लपलेला असतो. इंटरव्हलनंतर तुझा मुलगा आणि गर्लफ्रेंड बागेत थोडा वेळ प्रेम करून गाणं म्हणतात आणि माझ्या घरी येऊन मला ठार करतात. शूटिंग एकदा तुझ्या घरी, नंतर बागेत आणि मग माझ्या घरी. कमीत कमी खर्च.
पण सिनेमा चालेल का?
सिनेमा रिलीज व्हायच्या वेळी तू सरकारवर जोरदार टीका कर. तुझ्या मुलाला त्याच दिवशी सरकारच्या बाजूने बोलायला सांग. म्हणजे सोशल मीडियावर सिनेमाच्या बाजूने आणि विरुद्ध दोन्ही साइडनी चर्चा होऊन पिक्चर गाजेल. सरकारच्या बाजूचे आणि विरोधक दोघे पिक्चर बघतील. शिवाय कसं आहे, इंटरव्हलच्या आधी तू आणि इंटरव्हलनंतर तुझा मुलगा पडद्यावर येणार. टॉकीजमध्ये अर्ध्या सिनेमाच्या वेळी एका बाजूचे आणि नंतर दुसऱ्या बाजूचे प्रेक्षक येतील. त्यांची आपसात भांडणे किंवा टॉकीजची मोडतोड होण्याची पण भीती नाही. उद्या मानधन घेऊन येतो असं सांगून जग्गू गेला तो अद्याप परत आला नाही!
विजय तरवडे