शिरूर -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांच्या मदतीला शिरूरची तरुणाई धावली आहे. किराणा मालाचे वाटप, जेवणाचे डबे तर भाजीपाला, नाष्टा, दूध गरजू नागरिकांना देण्यात येत आहे.
या उपक्रमात पोलीसही मदतीला सरसावले आहेत. उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या वतीने शहरातील गोरगरिबांना नागरिकांना घरपोच जेवणाचा डबा नगरपरिषदेच्या वतीने देण्यात येणार आहे. आमदार ऍड. अशोक पवार यांच्या प्रयत्नातून पाच रुपयांमध्ये शिवभोजन थाळी शहरात पहिल्यांदाच सुरू केली आहे.
माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे यांनी उद्योगपती प्रकाशभाऊ रसिकलाल धारीवाल प्रतिष्ठानच्या वतीने शिरूर शहरातील शांतीनगर झोपडपट्टी इंदिरानगर झोपडपट्टी येथील कुटुंबीयांना मदतीचा हात दिला आहे.मास्क वाटप करण्यात आले आहे.
व्यापारी अमजद शेख सौदागर, शहानूर शेख सौदागर यांच्या वतीने अनाथ, भटक्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. एजाज बागवान, राहील शेख यांच्या वतीने किराणा मालाचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सतीश घोलप मित्र मंडळाच्या वतीने झोपडपट्टीतील नागरिकांना किराणामाल व भाजीपाला देण्यात आला.
शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी किराणा मालाचे व मास्क वाटप करण्यात आले. जैन समाजाच्या वतीने विनोद धारिवाल कपिल बोरा कोठारी यांच्या वतीने गोरगरीबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले. शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नाष्टा देण्यात आला.
आपात्कालीन व्यवस्थापन ग्रुपतर्फे रक्तदान शिबिरात 73 जणांनी रक्तदान केले. आपत्कालीन ग्रुपचे तुकाराम खोले, संतोष शितोळे, सागर पांढरकामे यांनी आयोजन केले.