शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर शहर येथील कापड बाजार येथे प्रॉपर्टीच्या वादातून मेहुण्याच्या मुलाने केलेल्या मारहाणीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिली आहे.
ही घटना 14 जून(रविवार) सकाळी सव्वा सहा वाजता घडली आहे. मकबूल अब्दुल रहमान खान (वय 70, रा.इलियास बी मंजिल, कापड बाजार शिरूर) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी मोसीन नासीरखान पठाण, जफर रहीम खान, रामजान आदम पटेल, तरसदूर उर्फ सलमान ताहीरअली शेख (सर्व राहणार भाजी बाजार शिरूर) या चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल जहीर मकबुल खान वय 42 रा. कापड बाजार शिरूर यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादीचे आईचे वडिलोपार्जित शिरुर शहरात वेगवेगळ्या २८ ठिकाणी असणाऱ्या प्राॅपर्टीचा शिवाजी नगर न्यायालयात वाद चालू असुन यात आरोपी मोसिन पठाण यांचे वडील नासीरखान पठाण हेदेखील पक्षकार आहेत.
आज रविवार दि. १४ रोजी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी, त्याचे वडील मकबूल, पत्नी रेश्मा, बहिण खालेदा इलियास शेख, फहमीदा मतीन खान असे कापड बाजार येथील इलियासी मंजिल या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला असता त्यांचा हक्क असुनही त्या ठिकाणी येऊ नये म्हणून यातील आरोपी जाफर रहिम पठाण व मोसिन नासिरखान पठाण यांनी फिर्यादी चे वडिल मकबूल अब्दुल रहिम खान यांना डोक्यामध्ये काठीने मारहाण करुन खुन केला.
फिर्यादी त्याची पत्नी, व बहिण यांना आरोपी जाफर रहिम खान , मोसिन नासिरखान पठाण , रमजान आदम पटेल, तस्सवुर उर्फ सलमान शेख यांनी हाताने मारहाण करुन शिवीगाळ केले बाबत फिर्यादी अब्दुल जहिर मकबूल खान यांनी तक्रार दिल्याने शिरुर पोलिस ठाण्यात खुन करून धमकी,शिवीगाळ केले बाबत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविण खानापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरदेव काबुगडे करित आहेत.